आत्महत्या केलेल्या 76 शेतकऱ्यांची प्रकरणं पात्र करुन एक लाखाची मदत 

 - कौस्तुभ दिवेगावकर
 

उस्मानाबाद - जिल्हयात 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2020 कालावधीत आत्महत्या केलेल्या 94 शेतकऱ्यांच्या प्रकरणांचे पुनर्विलोकन करुन त्यापैकी 76 प्रकरणे पात्र ठरवून त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक लाख रुपये देण्याचा निर्णय जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीने घेतला आहे. संबंधित कुटुंबाना एक लाख रुपयाचा निधी वितरित करण्याचे आदेशही संबंधित तहलसीलदारांना दिले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज येथे दिली.

          उस्मानाबाद जिल्हयात यापूर्वी जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समिती ही शासन निर्णय दि. 27 फेब्रुवारी 2006 मधील सुधारीत निकषनुसार शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, सहकारी पतसंस्था, मान्यता प्राप्त सावकार यांच्याकडून कर्ज घेतले असल्यास आणि या कर्जाची परतफेड न करता आल्यामुळे कर्जाचे हप्ते प्रलंबित असल्यास त्या व्यक्तीस मदतीसाठी पात्र ठरविण्यात यावे, या एकाच निकषानुसार शेतकरी आत्महत्या प्रकरणे ही पात्र किंवा अपात्र ठरविण्यात येत होती.

          त्यानिकषनुसार दि. 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीमध्ये जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीने एकून 94 शेतकरी आत्महत्या प्रकरणे ही अपात्र ठरविण्यात आली होती. या 94 अपात्र शेतकरी आत्महत्या प्रकरणाबाबत औरंगाबादचे विभागीय आयुक्त यांच्याकडे दि.24 डिसेंबर 2020 रोजी  औरंगाबाद विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांची आढवा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये विभागीय आयुक्त यांनी उस्मानाबाद जिल्हयातील शेतकरी आत्माहत्या प्रकरणांमध्ये अपात्र होणाऱ्या प्रकरणांची संख्या खूप असून त्याचा फेरआढवा घेण्याबाबत सूचना केली होती.

          त्यानुसार उस्मानाबाद जिल्हयाच्या जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीची बैठक दि.4 जानेवारी 2021 रोजी आयोजित करण्यात आली. या बैठकीमध्ये दि. 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीमध्ये अपात्र झालेल्या 94 शेतकरी आत्महत्या प्रकरणांचे पुर्नर्विलोकन करण्यात आले. या  अपात्र 94 शेतकरी आत्महत्या प्रकरणांबाबत शासन निर्णय दि. 23 जानेवारी 2006 नुसार नापिकी, राष्ट्रीयकृत बँक/ सहकारी बँक किंवा मान्यताप्राप्त सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करु न शकल्यामुळे होणारा कर्जबाजारीपणा आणि कर्जपरतफेडीचा तगादा या तीन कारणामुळे आत्महत्या घडली असल्यास संबंधित शेतकऱ्यांच्या वारसांना   1 लाख रुपये मदत देय राहील, असे नमूद आहे. त्यानुसार या अपात्र 94 शेतकरी आत्महत्या प्रकरणां पैकी 76 शेतकऱ्यांच्या आत्महत्या या नापिकीमुळे झालेल्याचे  दिसून आले आहे.