तेरणा कारखाना सुरु करण्यासाठी दोन पावले पुढे - खा.ओमराजे निंबाळकर
उस्मानाबाद - तालुक्यातील ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना बंद असल्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे विविध प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे तेरणा बचाव संघर्ष समितीच्या वतीने हा कारखाना सुरू करण्यासाठी जनआंदोलन उभारले आहे. शिष्टमंडळाने हा कारखाना सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधीची मदत घेण्याचा अग्रक्रम हाती घेतला असून त्यासाठी समितीच्या शिष्टमंडळाने खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आ. कैलास पाटील यांची दि.२७ फेब्रुवारी रोजी भेट घेवून चर्चा केली.
यावेळी खा.ओमराजे निंबाळकर म्हणाले की, मी सार्वजनिक क्षेत्रात काम करण्याची सुरुवात तेरणा कारखान्यापासूनच केली आहे. हा कारखाना व्यवस्थित चालविण्यासाठी जिल्हा बँकेचे तत्कालीन कार्यकारी संचालक लावंड व भुक्तर यांनी मदत केली. सभासदांनी जो विश्वास दाखवला त्यामुळे मी काम करू शकलो. मात्र नंतर जिल्हा बँकेने तेरणाला आर्थिक मदत करायची नाही अशी भूमिका घेतल्यामुळे अडचणी वाढत गेल्या. परंतू त्यातून मार्ग काढण्यासाठी शिवसेना नेते प्रा. तानाजीराव सावंत यांनी ९ कोटी रुपये उपलब्ध करून दिले. तर माझ्या वैयक्तिक ओम जय ट्रेडिंग कंपनीच्या नावे सोलापूर जनता सहकारी बँकेचे सहा कोटीचे कर्ज काढून कारखाना चालविण्यासाठी प्रयत्न केला.
त्यानंतर या कारखान्यात राजकारण मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे हा कारखाना बंद पडला. सद्यस्थितीत जिल्हा बँकेचे कर्ज व कामगारांचा भविष्य निर्वाह फंड यांचे हप्ते थकल्यामुळे सर्व प्रक्रिया ठप्प झालेली आहे. त्यामुळे भविष्य निर्वाह निधीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांच्याकडे बैठक लावण्यासाठी खा शरद पवार यांची मदत घेत आहोत व बैठकीसाठी त्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र यासाठी भाजपाचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी कुठलीही आडकाठी न आणता प्रांजळपणाने पक्षीयस्तरावर वजन वापरून मदत करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहनही त्यांनी केले. तसेच प्रत्येकाची मानसिकता सकारात्मक असेल व सगळेजण यासाठी पळाले तर १०० टक्के हा कारखाना सुरू होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विशेष म्हणजे भाडे तत्त्वावर जो कोणी हा कारखाना चालविण्यासाठी घेईल त्यांना प्रत्येकांनी सहकार्य करणे अपेक्षित असल्याचेही नमूद केले. तर या कारखान्यात राजकारण आले नसते तर हा कारखाना बंदच पडला नसता असेही त्यांनी सांगितले. तर यावेळी बोलताना आ. कैलास पाटील म्हणाले की, राज्य सरकारने जिल्हा सहकारी बँकेची थँक हमे द्यावी यासाठी प्रस्ताव पाठवला असून येणाऱ्या अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेऊन याबाबत पाठपुरावा करणार आहे. तसेच वेळ प्रसंगी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची वेळ आली तरी आम्ही न्यायालयातचे दरवाजे ठोठावू असेही त्यांनी सांगितले.
मात्र या कारखान्याबाबत मागे काय झाले ? हे कोणीही काढत बसू नये. कारण त्यातून काहीच निष्पन्न होणार नसल्यामुळे मुख्य मुद्यावरून लक्ष विचलित होऊन हा प्रश्न तसाच रेंगाळत पडू शकतो. पीएफचा प्रश्न सोडविणे अत्यंत महत्त्वाचे असून तो सोडविण्यासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी वरिष्ठ स्तरावर बैठक घेऊन मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. तसेच जिल्हा बँकेने हा कारखाना दीर्घ कालावधीसाठी चालविण्यासाठी देणे गरजेचे आहे. मात्र कारखान्यावर अवसायक असताना निवडणूक घेता येत नसल्यामुळे अधिकाऱ्यामार्फत भाडेतत्त्वावर देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच यामध्ये आमच्याकडून काडीचेही राजकारण होणार नसल्याचे आश्वासन देत ते म्हणाले की, राज्य सरकारने दिलेली थकहमी ही जिल्हा बँक कर्ज खात्यात वर्ग करणार असल्यामुळे त्यातील एक रुपया देखील भविष्य निर्वाह निधीसाठी उपलब्ध करता येणार नाही. तर या कारखान्यासाठी आम्ही प्रयत्न करायला पाहिजे होते ते तेरणा बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून करण्यात येत असल्यामुळे यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही. जर किल्लारी कारखान्याचे पुनर्जीवीत होऊ शकते तर तेरणाचे का होऊ शकत नाही ? असे म्हणत भविष्य निर्वाह निधीचा प्रश्न हा केंद्र सरकारशी निगडित आहे. त्यामुळे कुणीही हेवेदावे न करता आपापली शक्ती व राजकीय संबंध यासाठी कामी आणावेत अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी संघर्ष समिती शिष्टमंडळातील सदस्यांनी भविष्य निर्वाह निधीचे हप्ते का थकले ? थक हमीची रक्कम शासनाने देण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत. राजकीय हेवेदावे असेच राहिले तर कारखाना सुरू होऊ शकणार नाही. त्यामुळे कोणीही हेवेदावे न करता यासाठी राजकारण विरहित मदतीसाठी प्रयत्न करावेत, कारखाना चालू झाल्यानंतर भविष्य निर्वाह निधीची थकीत रक्कम हप्ते पाडून भरण्याची विनंती भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे करावी, थक हमीची रक्कम शासनाने देण्यासाठी प्रयत्न करावेत यासह विविध प्रश्न मांडले. या सर्व बाबीवर सविस्तर व अतिशय प्रमाणिकपणे परंतू सकारात्मक चर्चा करण्यात आली.
तेरणा बचाव संघर्ष समितीचे लोकप्रतिनिधींना निवेदन
तेरणा बचाव संघर्ष समितीच्यावतीने हा कारखाना सुरू व्हावा यासाठी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. राणाजगजितसिंह पाटील व आ. कैलास पाटील यांना निवेदनाद्वारे विनंती वजा मागणी केली असून यामध्ये कोणीही राजकारण न करता हा कारखाना शेतकरी पुत्राचा आहे. तो कोणत्याही परिस्थितीत चालू झालाच पाहिजे यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत असे नमूद करण्यात आले आहे.
सर्व लोकप्रतिनिधी तेरणासाठी एकवटले !
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी हा कारखाना सुरू होण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत व त्यासाठी आवश्यक त्या बैठका घेण्याबरोबरच सकारात्मक भूमिका द्यावी. तसेच सर्व प्रश्न मार्गी लावावेत. यासाठी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. कैलास पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार यांना तर आ. कैलास पाटील यांनी आ. राणाजगजिसिंह पाटील यांना पत्र पाठवून याबाबत बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली आहे. त्यामुळे सर्व लोकप्रतिनिधी प्रथमच या माध्यमातून एकत्र येत सकारात्मक भूमिका घेऊन कामाला लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे.