ओमायक्रॉनचा धोका वाढला : उस्मानाबाद जिल्ह्यात पुन्हा निर्बंध लागू 

रात्री नऊ ते सकाळी सहापर्यंत जमावबंदी 
 

उस्मानाबाद - जिल्ह्यात कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले व संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर विवाह, धार्मिक व अन्य कार्यक्रमांवर पुन्हा निर्बंध घालण्यात आले आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी आदेश निर्गमित केले आहेत. यामध्ये सध्या अशा कार्यक्रमांना केवळ १०० तसेच खुल्या जागेत कार्यक्रम असेल तर २५० व्यक्तींच्या उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात कोठेही मास्क, सॅनिटायझर वापराबाबत गांभीर्य नाही. यामुळे जिल्ह्यात कोरोना किंवा ओमिक्रॉनचे रुग्ण वाढल्यास उपस्थितीवर आणखी मर्यादा टाकण्यात येतील, असे निर्देश देण्यात आले आहेत. 

उस्मानाबाद जिल्ह्याला दुसऱ्या कोरोना लाटेचा तडाखा चांगलाच बसला होता. त्यानंतर लाट जशी ओसरत गेली तसे त्यावेळी टाकण्यात आलेले निर्बंधही शिथिल करण्यात आले. यामुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला होता. मात्र, डिसेंबरमध्ये राज्यात व जिल्ह्यात काही प्रमाणात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. यामुळे राज्य शासनाने घातलेल्या निर्बंधांची कठोरतेने अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सोमवारी दिले आहेत. याची अंमलबजावणी २५ डिसेंबरपासूनच राज्य शासनाच्या आदेशावरून सुरू झाली आहे. 

रात्री नऊ ते सकाळी सहापर्यंत जमावबंदी 

रात्री नऊ ते सकाळी सहापर्यंत जमावबंदी करण्यात आली आहे. म्हणजेच या कालावधीत पाचपेक्षा अधिक नागरिकांना एकत्र येता येणार नाही. यामुळे नवीन वर्षाच्या स्वागत समारंभावरही संक्रांत आली आहे. रात्री १२ वाजता नवीन वर्षाचे स्वागत करण्यात येत असते. आता पाचपेक्षा अधिक व्यक्तींना नवीन वर्षाचे कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत.

आसनक्षमतेच्या ५० टक्के परवानगी

आता प्रत्येक विवाह समारंभ, कोणत्याही धार्मिक कार्यक्रमांमध्ये केवळ १०० व्यक्तींनाच मर्यादा असणार आहे. कार्यक्रमाची जागा खुली असेल तर मग मात्र, २५० जणांना उपस्थितीची परवानगी असणार आहे. तसेच एखाद्या हॉलची क्षमता किंवा खुल्या जागेच्या आसन क्षमतेपेक्षा २५ टक्के, यापैकी जी लहान संख्या अाहे, तितकीच उपस्थितीस परवानगी राहणार आहे. जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी सध्या परिस्थिती पाहून असे आदेश दिले आहेत. मात्र, आगामी काळाता रुग्णांच्या संख्येत वाढ झाली तर कार्यक्रमातील उपस्थितीवर आणखी मर्यादा येण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी संभाव्य धोका टाळण्यासाठी मास्क, सुरक्षित अंतर, सॅनिटायझरचा उपयोग आदी नियमावलीचे कठोरतेने पालन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

जेथे कायम आसन असतील म्हणजेच चित्रपटगृह, नाट्यगृह अशा ठिकाणी राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रम नसेल तर संबंधित परवानगी देणाऱ्या यंत्रणेने ठरवून दिलेल्या आसनांपैकी ५० टक्क्यांपेक्षा अधिक उपस्थिती असणार नाही. ओपन टॉकीजसारखे कार्यक्रम असतील तर तेथे मात्र, २५ टक्केच उपस्थिती ठेवावी लागेल. जिल्ह्यात केवळ एकच चित्रपटगृह आहे. टुरींग, ओपन टॉकिज केवळ यात्रेत येऊ शकतात. तसेच नाट्यगृहातील कार्यक्रम बंदच आहेत.

जिम, स्पाकरताही निर्बंध

जिम, व्यायामशाळा, स्पामध्ये येणाऱ्यांची संख्याही ५० टक्केच असणे अनिवार्य आहे. अनेक दिवस बंदीनंतर आता कोठे याची सुरूवात झाली असताना पुन्हा निर्बंध घालण्याची वेळ आली आहे. तसेच क्रीडा स्पर्धांमध्येही केवळ २५ टक्के प्रेक्षकांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे.

नागरिकांमध्ये अधिक बेपर्वाई
तिसऱ्या लाटेचे संकट घोंघावत असताना निष्काळजीपणा संपलेला नाही. नागरिक सार्वजनिक ठिकाणी गर्दी करत आहेत. सुरक्षित अंतर ठेवत नाहीत, मास्कचा वापरही योग्य प्रकारे होत नाही. काही शासकीय कार्यालयांमध्येही कर्मचारी मास्कचा वापर करताना दिसत नाहीत. असाच प्रकार कायम राहिल्यास आगामी काळात रुग्णवाढ होऊ शकते. पर्यायाने त्यावेळी थेट निर्बंध वाढवण्याशिवाय पर्याय असणार नाही.