धाराशिवमध्ये दिशा समितीची बैठकीला अधिकाऱ्यांची दांडी 

अनुपस्थित अधिकाऱ्यांविरुद्ध  हक्कभंगाची तक्रार दाखल करणार - खा. ओमराजे 
 

धाराशिव - दि. 24 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक पार पडली सदर बैठकीस आमदार कैलास पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी प्रांजल शिंदे, समितीचे सदस्य सोमनाथ गुरव, माजी जिल्हा परिषद सदस्य दीपक जवळगे उपस्थित होते.

            जनतेसाठी महत्वाच्या असणाऱ्या बैठकांना दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी चांगलाच धडा शिकवला. दिशा समितीच्या बैठकीला विभागप्रमुख अधिकाऱ्यांनी अनुपस्थिती दर्शविली. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह इतरही विभागाचे अधिकारी नसल्याचे पाहून खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी त्यांची नावे लिहून घेण्यास सांगितले, बैठकीला यायला जमत नाही मग दिल्लीवारी करा असा इशाराच खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिला आहे.

            सुरुवातीला जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी नसल्यावर खासदार शांत राहिले. नंतर मात्र जसे-जसे वेगवेगळ्या विभागाच्या संदर्भात माहिती देण्याची वेळ येवु लागली तिथे अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी उत्तर देत असल्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या निदर्शनास आले तरीही त्यांनी संयम राखत बैठक सुरु ठेवली मात्र अनुपस्थित अधिकाऱ्यांची संख्या अधिक दिसू लागली, तेव्हा मात्र खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा पारा चढला व त्यांनी बैठक थांबविण्यास सांगितले. आमच्या घरच्या कामासाठी अधिकाऱ्यांना बोलावले होते का ? असा सवाल करीत त्यांनी उपस्थित व अनुपस्थित अशा सर्वांची हजेरी घ्यायला लावली. तेव्हा 20 पैकी 9 अधिकारी गैरहजर असल्याचे समोर आले.

            जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी नसल्याने अनुपस्थित असलेल्या लोकांची संख्या अधिक दिसून आली. जे अधिकारी गैरहजर असतील त्यांच्या विभागाची माहिती आता त्यांच्याकडून कधी घ्यायची ते नंतर बघुया असे सांगत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी त्यांना दिल्लीवारी करावी लागणार असा इशारा दिला. अगोदर नोटीस देवुन ही तारीख सांगितल्यानंतर अशाप्रकारे गैरहजर राहण्याचा प्रकार म्हणजे अधिकारी मनमानी कारभार करु लागल्याचे दिसून येत आहे.

            स्थानिक सभागृहात लोकप्रतिनिधी नसल्याने यांना मालक झाल्यासारखे वाटत असेल पण यापुढे लक्षात ठेवा या गोष्टी सहन करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी यांनाही हा निरोप द्या मला काही काम नाही म्हणुन बैठका लावत नाही जनतेच्या प्रश्नासाठी बैठक असून याचे गांभीर्य नसल्याचे यावरुन दिसत असल्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी म्हटले.


            जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून राबवलेल्या पाणीपुरवठा योजनांचा खर्च वाढवून कंत्राटदारांना फायदा करुन देण्यासाठी योजना राबवलेल्या गावांपासून दुर असलेल्या प्रकल्पांचा उद्भव (वॉटर सोर्स) दाखवण्याच्या प्रकाराची दिशा समितीच्या बैठकीत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी पोलखोल केली. किणी (ता. धाराशिव) तेरणा तलावापासून 2.5 किमी असतानाही तेथील योजनेसाठी 4.5 किमी असलेल्या उपळा येथील उद्भव दाखवला शेकापूरसाठीही शेरकर वाडगा शिवारातील तलाव जवळ असताना दूरच्या वाघोली तलावाचा उद्भव दाखवला. विशेष म्हणजे याच तलावातून धाराशिवलाही पाणी पुरवठा झाला तसेच मांडवा (ता. कळंब), काटी (सावरगाव ता. तुळजापूर) येथे जवळ प्रकल्प असताना दुरच्या प्रकल्पांचा उद्भव दाखवला अशा विविध गावांची यादीच आमदार कैलास पाटील यांनी सांगून योजनांचा खर्च वाढुन कंत्राटदाराला फायदा करण्याचा प्रयत्न होत आहे का ? असा जाब विचारला तेव्हा पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना काहीच उत्तरे देता आली नाहीत. दुरचा उद्भव दाखवल्याने वीज बीलाचा भार संबंधित ग्रामपंचायतींवर पडतो उत्पन्न नसल्याने भरमसाठ बील भरले जात नाही. यामुळे वीजपुरवठा खंडित केला जाते. परिणामी कोट्यावधींची योजना असतानाही लोकांना पाणी मिळत नाही. गावागावात जलकुंभ थडगी बनून राहतात, तेव्हा याला जबाबदार कोण असा प्रश्न खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी विचारला.

            अनेक ठिकाणी राष्ट्रीय महामार्गा शेजारीच अंतर्गैत सेवा रस्ते तयार करण्यात आलेले नाहीत. सातत्याने मागणी करुनही याला कंत्राटदार प्रतिसाद देत नाहीत. प्रत्येकवेळी प्रपोजल पाठवले इतकेच उत्तर मिळते. याही बैठकीत तसेच उत्तर अधिकाऱ्यांनी दिले. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी प्रपोजल कधी मंजूर होणार, प्रक्रिया कधी होणार याची तारिख विचारली तेव्हा अधिकाऱ्याने तारीख सांगता येणार नसल्याचे म्हटले. यामुळे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी 7 दिवसांत उत्तर न दिल्यास येडशी व तामलवाडी येथील टोलनाके बंद करण्याचे आंदोलन करण्याचा इशारा दिला.