गुटखा तस्करीत नळदुर्ग पोलिसांचे हात गुंतले , हा घ्या पुरावा .... ( Video )
नळदुर्ग - आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यातून धाराशिव जिल्ह्यात येणारा गुटखा उमरगा, नळदुर्ग मार्गे संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात वितरित केला जातो. या भागातून गुटखा पुरवठा करणाऱ्या नकुल पंडित ( मूळ आडनाव साळवी ) ने स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पोलिसांमार्फत पोलिसाना दरमहा हप्ता पोहच करण्याची व्यवस्था लावल्याने उमरगा आणि नळदुर्ग पोलीस स्टेशनचे कारभारी मागील काही वर्षात मालामाल झाले आहेत. मात्र चोरीचा माल वाटण्यावरून चोरी उघडी पडण्यात व्हावे तसे झाले आहे.
उमरगा - सोलापूर किंवा नळदुर्ग - तुळजापूर रस्त्यावर गुटखाची गाडी पकडून चालकास पोलिसांची भीती दाखवून लाखो रुपयाची खंडणी वसूल करणारी टोळी नळदुर्गमध्ये सक्रिय आहे. या टोळीवर यापूर्वी गुन्हे दाखल होऊनही ही टोळी आजही तेच काम करत आहे आणि नळदुर्गचे तत्कालीन सपोनि सिद्धेश्वर गोरे त्यांचा सहारा घेत होते. आपण पोलीस असल्याची किंवा पोलीस मित्र असल्याची बतावणी करून हा कुटीरउद्योग सुरु होता.
या टोळीने जेथून गुटखा निघतो, तेथे आपली गुप्तचर यंत्रणा ठेवली आहे. आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यातून निघालेला गुटखा उमरगा, नळदुर्ग हद्दीत येताच, ही टोळी ती गाडी पकडून चालकाबरोबर तोडपाणी करीत होती. ज्यांचा हप्ता सुरु आहे, त्यांना सोडून द्यायचे आणि ज्यांनी हप्ता दिला नाही, त्यांना पकडून पोलिसांना बोलावून घ्यायचे, येथे तोडजोड झाली तर ठीक नाही तर गुन्हा दाखल करायचा आणि आपण मोठी कामगिरी केल्याचा आव आणून काही पत्रकारामार्फत बातम्या ,रील तयार करून स्वतःहून पाठ थोपटून घ्यायचा उद्योग सुरु होता,
गुटखा तस्करी आणि गांजा तस्करीत नळदुर्ग भागातील दोन टोळ्या कार्यरत असून, त्यांना पोलिसांचा आशीर्वाद असल्याने या टोळीतील तरुणाकडे महागडे मोबाईल, गाड्या दिसून येत आहेत तसेच स्थानिक गुन्हे शाखेचा एक पोलीस, उमरगा आणि नळदुर्ग पोलीस स्टेशनमधील पोलीस देखील मालामाल झाले आहेत,.
अशी उघडी पडली चोरी
नळदुर्ग - तुळजापूर रस्त्यावर दि. १९ जुलै रोजी रात्री नळदुर्गच्या या टोळीने एक आयशर टेम्पो ( क्रमांक एम एच २५, इजे १४८६ ) अडवला आणि चालकास जबरी मारहाण करून, टेम्पो घेऊन नळदुर्गचे तत्कालीन सपोनि सिद्धेश्वर गोरे यांच्या हवाली केले. गोरे यांनी टेम्पो चालकांबरोबर अर्थपूर्ण बोलणी करून दोन दिवसानंतर चालक माडजे यास बोलावून, काही अज्ञात लोकांनी मारहाण करून खिशातील ३० हजार लुटून नेल्याचा जबरी चोरीचा ( भादंवि ३९४ ) गुन्हा दाखल केला आणि याप्रकरणी नळदुर्गमधील दोघांना अटक केली.
टेम्पोमध्ये गुटखा असताना, गोरे यांनी चालकांवर गुटख्याचा गुन्हा दाखल करण्याऐवजी आणि आपणास मिळालेला वाटा ( पैसे ) देण्याऐवजी आपणावरच गुन्हा दाखल केला म्हणून नळदुर्गमधील सराईत गुन्हेगार चिडले. एका आरोपीच्या चुलत्याने कॉल रेकॉर्ड आणि पुरावे थेट पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि विशेष पोलीस महानिरीक्षक यांना दिले आणि अवघ्या चार दिवसात गोरेंची पोलीस मुख्यालयात उचलबांगडी झाली.
त्या टेम्पोमध्ये लाखो रुपयांचा गुटखा असताना, सिद्धेश्वर गोरे यांनी टेम्पो सोडून का दिला ? गुटख्याचा गुन्हा दाखल का केला नाही ? याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी गोरे यांच्यावर कडक कारवाई करणार का ? याकडे लक्ष वेधले आहे. या प्रकरणात गोरे मालामाल झाल्याची चर्चा सुरु आहे. गोरे यांच्या संपत्तीची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने चौकशी करावी, अशी मागणी पुढे येत आहे.
नकुल पंडित बरोबर कुणाचे संबंध ? सीडीआर तपासा ...
आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यातून धाराशिव जिल्ह्यात येणारा गुटखा उमरगा, नळदुर्ग मार्गे संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात वितरित केला जातो. या भागातून गुटखा पुरवठा करणाऱ्या नकुल पंडित ( मूळ आडनाव साळवी ) ने स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पोलिसांमार्फत पोलिसाना दरमहा हप्ता पोहच करण्याची व्यवस्था लावली आहे. जिल्ह्यात जवळपास दहा लाख रुपये दरमहा वाटप होत असल्याचे समोर येत आहे.
गुटखा तस्कर नकुल पंडित ( मूळ आडनाव साळवी ) याचे नाव सोलापूरच्या एका गुन्ह्यात सर्वप्रथम उघड झाले होते, तेथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपनिरीक्षकाने कर्नाटक राज्यातील हुमनाबाद येथे जाऊन मोठी कारवाई केली होती. जवळपास २ कोटींचा मुद्देमाल जप्त केला होता.
गुटख्याची गाडी पकडणारी टोळी नळदुर्ग, उमरगा, लातूर, तुळजापूर, सोलापूर येथे सक्रिय असून, या टोळीतील तरुण झिरो पोलीस म्हणून रात्रभर उमरगा - सोलापूर आणि नळदुर्ग - तुळजापूर रस्त्यावर रात्रभर गस्त घालत असल्याचे दिसून येत आहे,.
नकुल पंडित ( मूळ आडनाव साळवी याचे सीडीआर तपासल्यास धाराशिव जिल्ह्यातील कोणकोणते पोलीस गुटखा तस्करीत अडकले आहेत, हे उघडकीस येणार आहे.