कळंब : रस्त्यांच्या कामासाठी चार कोटी 52 लाख रुपयांचा निधी मंजूर

आमदार घाडगे -पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे निधी मंजूर
 

उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील दोन ठिकाणच्या रस्त्यांच्या कामासाठी आणि एका गावालगतच्या पुलाच्या बांधकामासाठी नाबार्डअंतर्गत चार कोटी 52 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या रस्ता आणि पुलाच्या कामांना निधी उपलब्ध करून दयावा, यासाठी आमदार कैलास घाडगे- पाटील यांनी प्रयत्न केले. आमदार घाडगे -पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर करण्यात आला आहे.

कळंब तालुक्यातील बहुला- इटकूर- मांडवा आणि मंगरुळ- खामसवाडी- तडवळा रोड या रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. तर डोंगरेवाडी पिंपळगाव -बावी- परतापूर- दहिफळ या रस्त्यावरील दहिफळजवळ पुलाअभावी ग्रामस्थांना वाहतूक करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या रस्त्याच्या कामासाठी व पुलासाठी तेथील ग्रामस्थांकडून अनेकवेळा पाठपुरावाही करण्यात आला होता. मात्र यासाठी निधी उपलब्ध होत नव्हता. त्यामुळे ग्रामस्थांना अनेक गैरसोयींना तोंड द्यावे लागत होते.

 याबाबत लेथील ग्रामस्थांनी आमदार घाडगे- पाटील यांच्याकडे रस्त्याच्या कामासाठी व दहिफळजवळच्या पुलासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानंतर आमदार घाडगे -पाटील यांनी या रस्त्यांच्या कामांना आणि पुलाच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला. त्यानुसार बहुला -इटकूर- मांडवा या रस्त्यावरील इटकूरपासून तीन किलोमीटरपर्यंतचा रस्ता करण्यासाठी दोन कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय राज्यमार्गापासून मंगरुळ, खामसवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी एक कोटी 32 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. दहिफळजवळील पुलाच्या बांधकामासाठी एक कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. 

आमदार घाडगे -पाटील यांनी या रस्त्याच्या आणि पुलाच्या बांधकामासाठी निधी मिळावा म्हणून सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. नाबार्डअंतर्गत या कामांना निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांसाठी निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार कैलास घाडगे -पाटील यांचे आभार मानले आहेत.