इटकळ बनले अवैध धंद्याचे माहेरघर ! 

शहापूरमध्ये हातभट्टीचा पूर ...  
 

नळदुर्ग -  सपोनि जगदीश राऊत यांच्या आशिर्वादामुळे  इटकळ गाव  अक्षरशः  अवैध धंद्याचे माहेरघर बनले आहे. गावात अवैध दारू ( हातभट्टी ) विक्री, शिंदी विक्री, गुटखा विक्री  खुलेआम सुरु असून, मटका आणि जुगार राजरोस सुरु आहे. 

 इटकळ गाव  उमरगा - सोलापूर हमरस्त्यावर आहे तसेच येथून अक्कलकोटला रस्ता जातो. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. बस स्थानकावर असलेल्या अनेक पान टपरी आणि हॉटेलमध्ये गुटखा विक्री  खुलेआम सुरु आहे. काही पान  टपरीवर उघड - उघड   मटका घेतला जात आहे. गावात अनेक ठिकाणी अवैध दारू विक्री सुरु आहे. 

मटका बहाद्दरांची तर 'ओपन जेवू देईना आणि क्लोज झोप देईना' अशी अवस्था झाली असून, मटक्याच्या नादी  लागून अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत.  पोलिसांना दरमहा हप्ता मिळत असल्याने मटकाकिंगवर  कोणतीही कारवाई  होत नाही. त्यामुळे आमचे कुणी वाकडे करू शकत नाही, अशी धारणा त्यांची झाली आहे. 

तसेच जवळच असलेल्या शहापूरमध्ये हातभट्टीचा पूर आला आहे. गावात अनेक ठिकाणी हातभट्टीची दारू खुलेआम विकली जात आहे. यामुळे तळीरामांचा  सुळसुळाट वाढला आहे. 

नळदुर्ग पोलीस स्टेशन हे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी झाली आहे. येथे येणारा प्रत्येक सपोनि गबरगंड होतो आणि जाताना बदनाम होवून  जातो. 

सपोनि  जगदीश राऊत यांनी आपली काळी बाजू झाकण्यासाठी हजार - पाचशे घेवून  बातम्या देणाऱ्या काही भुरट्या पत्रकारांना हाताशी धरून स्वतःची  इमेज बिल्डिंग करण्याचा प्रयत्न केला, पत्रावळीमध्ये आणि बेकायदेशीर युट्युब चॅनलमध्ये काही खोट्या बातम्या छापून आणल्या पण उस्मानाबाद लाइव्हने सत्य बातम्या छापून राऊतांचा खरा चेहरा समोर आणला. त्यामुळे त्यांची बदली अटळ मानली जात आहे.