शिवसेनेचा उस्मानाबादसाठीच हात आखडता का ?

रेल्वे प्रकल्पासाठी निधी द्या- आ. राणाजगजितसिंह पाटील
 

उस्मानाबाद  - उस्मानाबाद जिल्ह्यासाठी अतिशय महत्वाच्या असलेल्या सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारचा ५०% हिस्सा दिला जात नसल्याने परंतु राज्यातील इतर रेल्वे प्रकल्पांना आर्थिक तरतूद केली जात असल्याने शिवसेना उस्मानाबाद जिल्ह्याच्या बाबतीतच आखडता हात का घेतेय ? हा प्रश्न आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी उपस्थित केला आहे व मुख्यमंत्री . उद्धव ठाकरे यांना केंद्र सरकार प्रमाणे राज्य सरकारने देखील आपल्या हिश्याची रक्कम द्यावी ही पुनश्च आग्रही मागणी केली आहे.

 सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या रेल्वे मार्गासाठी राज्याच्या हिस्स्याच्या रक्कमेची तरतूद करावी यासाठी आ. राणाजगजितसिंह पाटील मागील २२ महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मार्च २०२१ मधील अर्थसंकल्पीय अधिवेशनात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिवसेना नेते परिवहनमंत्री ना.अनिल परब यांनी ‘सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे संपूर्णतः केंद्र शासनाच्या आर्थिक सहभागाने होणार असल्याने राज्य शासनाने निधी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही’ असे धक्कादायक, धादांत खोटे उत्तर दिले आहे. परिवहन मंत्री यांना त्यांची चूक निदर्शनास आणून देत राज्य शासनाचे संबंधित अधिकारी व रेल्वे विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक लावण्याची वारंवार मागणी करूनही परिवहन मंत्र्यांनी याबाबत अद्याप साधी बैठक लावण्याचीही तसदी घेतली नाही.

पंतप्रधान ना.नरेंद्रजी मोदी साहेबांनी तुळजापूर येथील सभेत सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्ग मंजुरीचा शब्द दिला होता व हा शब्द पाळत या प्रकल्पाला मंजुरी देत सन २०१९ मध्ये या रेल्वे मार्गाचे भूमिपूजन केले होते. राज्यातील इतर रेल्वे मार्गाच्या प्रकल्पा प्रमाणे केंद्र शासनाचा ५०% व राज्य सरकारचा ५०% हिस्सा या प्रमाणे रु. ९०४.३२ कोटी अंदाजपत्रकीय किमतीच्या  एकूण ८४.४४ कि.मी. लांबीच्या रेल्वे मार्गास मंजुरी देण्यात आली होती. तत्कालीन मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या प्रकल्पाचा ५०% हिस्सा उचलण्यास सहमती कळविली होती. केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये या प्रकल्पासाठी रु.२२ कोटीची तरतूद केली आहे व प्रकल्पाचे काम सुरळीतपणे सुरु रहावे यासाठी सम प्रमाणातील राज्याच्या हिस्स्याच्या रकमेची मागणी रेल्वे विभागाचे मुख्य अभियंता (बांधकाम) यांनी प्रधान सचिव, गृह (परिवहन व बंदरे) यांच्याकडे केली आहे.  

राज्य सरकारने नाशिक-नगर-पुणे रेल्वे मार्गासाठी रु.१६१३९ कोटींच्या निम्मी तरतूद केली आहे, बीड - परळी लाही निधी दिला आहे. मात्र, सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी मागील दोन वर्षात कवडीचीही तरतूद करण्यात आली नाही. या रेल्वे मार्गाच्या भू-संपादनाच्या कामास सुरुवात झाली असून उस्मानाबाद साठी अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या प्रकल्पासाठी राज्याच्या हिश्याची रक्कम रेल्वे बोर्डाकडे वर्ग केली जात नसल्यामुळे या प्रकल्पाचे काम अत्यंत संथपणे सुरु आहे.

हिंदुह्रदय सम्राट आदरणीय स्व. बाळासाहेब ठाकरे आई तुळजाभवानी मातेचे निस्सीम भक्त होते व ठाकरे कुटुंबाची देखील भवानी मातेवर अपार श्रद्धा आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या कुलस्वामीनीच्या वास्तव्याने पावन तुळजापुर तिर्थक्षेत्र लवकरात लवकर रेल्वेच्या नकाशावर आणण्यासाठी व भाविक भक्तांची सोय करण्यासह या भागातील आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी राज्य सरकारच्या ५०% हिश्याची तरतूद करण्यासाठी तातडीने बैठक घेण्याची आग्रही मागणी आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांच्याकडे केली आहे.