आ.सतीश चव्हाण यांच्याकडून आश्वासनाची पूर्तता आमदार स्थानिक विकास निधीतून

उस्मानाबाद, उमरगा येथील शासकीय रूग्णालयांना दिल्या रूग्णवाहिका
 

उस्मानाबाद- मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीतून उस्मानाबाद येथील जिल्हा शासकीय सामान्य रूग्णालय व उमरगा येथील उपजिल्हा रूग्णालयास रूग्णवाहिका देण्यात आल्या असून आज (दि.3) आ.सतीश चव्हाण यांच्या हस्ते फीत कापून या दोन्ही रूग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय पाटील व उमरगा येथील प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ.विक‘म आंळगेकर यांच्याकडे आ.सतीश चव्हाण यांनी रूग्णवाहिकेच्या चाव्या सुपूर्द केल्या.

कोवीड-19 विषाणुमुळे उद्‌भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंधक व नियंत्रण करण्यासाठी तसेच जिल्हास्तरावर परिणामकारक प्रतिबंधात्मक कार्यवाही होण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने 16 एप्रिल 2021 रोजी वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदी करण्यासाठी विधीमंडळ सदस्यांना सन 2021-22 या आर्थिक वर्षात रू. 1 कोटी निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. आ.सतीश चव्हाण यांचा मतदारसंघ हा संपूर्ण मराठवाडा असल्याने कोवीड-19 च्या अनुषंगाने उपलब्ध करून दिलेला निधी त्यांनी मराठवाड्यातील विविध शासकीय रूग्णालयांना यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीसाठी दिला आहे. काही महिन्यांपूर्वी कोविडच्या पार्श्वभूमीवर आ.सतीश चव्हाण यांनी उस्मानाबाद तसेच उमरगा येथील शासकीय रूग्णालयांना भेटी दिल्या होत्या. त्यावेळी या दोन्ही ठिकाणी रूग्णवाहिकांची गरज लक्षात घेता आमदार निधीतून रूग्णवाहिका देण्याचे आश्वासन आ.सतीश चव्हाण यांनी दिले होते. त्यानुसार त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आज पूर्तता केली.

राज्यात कोविड विषाणूच्या संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आपली वैद्यकीय सेवा देणारी यंत्रणा सर्व बाजूने सज्ज असणे आवश्यक आहे. रूग्णवाहिके अभावी कुणालाही प्राण गमवावा लागू नये यासाठी मी माझ्या आमदार निधीतून उस्मानाबाद व उमरगा येथील शासकीय रूग्णालयांसाठी रूग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी ही रूग्णवाहिका उपलब्ध राहणार असून रूग्णांना तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास या रूग्णवाहिकेची नक्कीच मदत होईल असा विश्वास आ.सतीश चव्हाण यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केला.

याप्रसंगी एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष जिवनराव गोरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे  जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबळाकर, संजय दुधगावकर, आयाज शेख, सतीश इंगळे, संजय पवार, बाबा पवार, आदित्य गोरे, सुरेश पाटील, सुनिता पावसरे, बालाजी इतबारे, राजकुमार मेंढेकर, बालाजी तांबे, एकनाथ चव्हाण आदींची उपस्थिती होती.