पहिल्याच वर्षी लेडीज क्लबच्या मंगळागौरीला महिलांच्या गर्दीचा उच्चांक !

 

धाराशिव   -  लेडीज क्लब धाराशिव आयोजित, मंगळागौरी स्पर्धेला जिल्हाभरातून नाहीतर बाहेरूनही महिलांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत विक्रमी गर्दी केली. लेडीज क्लबच्या अध्यक्षा सौ.अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांनी यंदा लेडीज क्लबच्या व्यासपीठावर पहिल्यांदाच मंगळागौर स्पर्धेचे आयोजन केले होते. मंगळवार दिनांक २९/०८/२०२३ रोजी सायं. ०५ वा. मंगळागौरीच्या पूजनाने या स्पर्धेचे उद्घाटन झाले.

उद्घाटन पर भाषणात लेडीज क्लबच्या अध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील म्हणाल्या की, मी दरवर्षी तेर मध्ये मंगळागौर महोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करते. महिला या सणाला खूप मोठा प्रतिसाद देतात. पारंपारिक गाण्यावर झिम्मा, फुगडी आणि पारंपरिक खेळाचा आनंद घेतात. धाराशिव मध्ये ही याच धर्तीवर हा सण साजरा करण्याची माझी खूप दिवसापासून इच्छा होती ती या निमित्ताने पूर्ण झाली. महिलांनी इतका सुंदर प्रतिसाद दिलेला पाहून खूप आनंद होतोय. स्पर्धेमध्ये बक्षीस मिळणं महत्त्वाचे नसून यामुळे महिला आत्मनिर्भर झाल्या. त्या त्यांची कलासादर करण्यासाठी व्यासपीठावर आल्या ही खूप मोठी गोष्ट आहे.

दुपारी ३ पासून लेडीज क्लबच्या प्रांगणामध्ये महिलांनी गर्दी करायला सुरुवात केली होती. सायंकाळी ६ वाजता संपूर्ण क्लबचे मैदान गर्दीने फुलून आले होते.

या कार्यक्रमाला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांच्या सुविद्य पत्नी सौ.ओंबासे मॅडम आणि जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या पत्नी सौ. महिमा कुलकर्णी मॅडम यांची उपस्थिती होती.

जिल्हाभरातून २३ ग्रुपने या मंगळागौर स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. ०१ लाख रुपयांची रोख पारितोषिके हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य होते. तर लेडीज क्लबच्या अध्यक्षा. सौ.अर्चनाताई पाटील आणि त्यांच्या ग्रुपने सादर केलेल्या गीताला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या मंगळागौर स्पर्धेच्या ५०,००० रुपये  रोख प्रथम पारितोषिक विजेते ठरले विभागून ढोकी येथील आशाप्रवर्तक ग्रुप,  तुळजापूर येथील महालक्ष्मी माहेरवाशिन ग्रुप तर लोहारा येथील सप्तशृंगी ग्रुप !

३०,००० हजार रुपयांच्या दुसऱ्या क्रमांकाचे विजेते ठरले विभागून तुळजापूर येथील टाटा ग्रुप, येरमाळा येथील येडेश्वरी ग्रुप तर येडशी येथील ओळख स्वतःची हा ग्रुप.

तर तिसऱ्या क्रमांकावर धाराशिव येथील महसूल रणरागिणी ग्रुप, धाराशिव येथीलच रॉयल ग्रुप आणि वाशी येथील अजिंक्य टीचर्स ग्रुप यांनी २०,००० रुपयांचे बक्षीस विभागून पटकावले.

उत्तरोत्तर रंगत जाणाऱ्या स्पर्धेत स्पर्धक नसलेल्या महिलांनी व्यासपीठाच्या खाली नृत्याचा मनमुराद आनंद घेतला. विजेत्यांना लेडीज क्लबच्या अध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते रोख रक्कम बक्षीस आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी केसकर यांनी केले. यावेळी लेडीज क्लबच्या सर्व सदस्या व जिल्हाभरातून आलेल्या महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.