रुग्णालयांचे ऑक्सिजन यंत्रणा सुरक्षिततेसह अग्निसुरक्षा परिक्षण फायर सुरक्षा ऑडिट करावे 

- जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर 
 

उस्मानाबाद -  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयांनी ऑक्सिजन यंत्रणा सुसज्ज व सुरक्षित ठेवण्यासह अग्निसुरक्षा परीक्षण फायर सुरक्षा ऑडिट व विद्युत सुरक्षा तपासणी इलेक्ट्रिकल सुरक्षित ठेवावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत.

दिलेल्या आदेशात असे नमूद करण्यात आले आहे की, ज्याअर्थी उपरोक्त वाचा क्रमांक २ चे अधिसूचनेद्वारे राज्य शासनाने महाराष्ट्र कोविड -१९ उपाय योजना नियम २०२० प्रसिद्ध केली असून यातील नियम क्रमांक ३ नुसार कोरोना विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना  त्यांच्या कार्य क्षेत्रात सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे. त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील तरतुदीप्रमाणे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण हे कोणतीही आपत्ती रोखण्यासाठी किंवा आपत्ती विरुद्ध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी सक्षम प्राधिकारी आहेत. 

जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात कोरोना विषाणूंचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी या कार्यालयामार्फत स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येत आहेत. त्यामुळे कोरोना बाधित रुग्ण जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत व सर्व ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या विविध शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल होत आहेत. त्या अनुषंगाने त्यांच्यावर संबंधित रुग्णालयात  आवश्‍यक उपचार होत असतात. हे उपचार करीत असताना रुग्णांना आवश्यक असणारा ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात उपलब्ध असणे रुग्णालयांच्या अंतर्गत ऑक्सिजन साठवणूक व ऑक्सिजनचे वाहन सुरक्षित पद्धतीने करणे, अग्निसुरक्षा परीक्षण व विद्युत सुरक्षा तपासणी करणे याची खबरदारी सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयांची घेणे आवश्यक आहे. 

जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत व सर्व ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयांना आदेशित करीत आहेत की, त्यांनी आपल्या रुग्णालयामधील ऑक्सिजन साठवण यंत्रणा, ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा व ऑक्सीजन संबंधित सर्व बाबी सुस्थितीत असल्याचे व अग्निसुरक्षा परीक्षण व विद्युत सुरक्षा तपासणी त्रयस्थ संस्थेकडून ऑडिट करून घ्यावे. तसेच आपल्याकडील ऑक्सिजनची सर्व यंत्रणा सुस्थिती असल्याबाबत अग्निसुरक्षा परीक्षण व विद्युत सुरक्षा तपासणी प्रमाणपत्र जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद यांना उलट टपाली सादर करावे. त्यची एक प्रत या कार्यालयास सादर करुन तपासणी करणार्‍या यंत्रणे सोबत जोडलेल्या नमुन्यात प्रमाणपत्र सादर करावे. 

त्यामुळे भविष्यात शासकीय व खाजगी रुग्णालयात ऑक्सीजन गळती, आग लागणे इत्यादी अनुचित प्रकार घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित अस्थापनाची राहील. या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था आणि संघटना यांनी उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ आणि साथरोग कायदा १८९७ आणि यासंदर्भातील शासनाचे इतर अधिनियम व निर्माण व योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.