मूल्यवर्धित कर न भरल्याने सुनिल फार्म इंजिनिअरिंगविरुद्ध गुन्हा दाखल

 

उस्मानाबाद -व्यापारी श्रीमती. जाई दिपक पाटील उर्फ जाई अमर पाटील सोनवणे, मे. सुनिल फार्म इंजिनिअरिंग कंपनी.या व्यवसायाच्या मालक आहेत. व्यवसाय हा 15 डिसेंबर-2010 पासून सुनिल प्लाझा,जिल्हा स्टेडीयम,उस्मानाबाद येथे सुरू होता.सदरील व्यापाऱ्याने मुल्यवर्धित कर कायदा 2002 च्या कलम 23 (2) नुसार झालेल्या निर्धारणेप्रमाणे वित्तिय वर्ष 2013-14 चा येणारा कर,त्यावरील व्याज व दंड एकूण रु.२,१६,९६,२३१/- (अक्षरी- दोन कोटी सोळा लाख शहाण्णव हजार दोनशे एकतीस रुपये फक्त) चा अद्याप भरणा केलेला नाही. 

तसेच सदर कर भरण्यासंबधी मे. सुनिल फार्म इंजिनिअरिंग कं. च्या मालक श्रीमती. जाई दिपक पाटील उर्फ जाई अमर पाटील सोनवणे यांना प्रत्यक्ष भेट न झाल्यामुळे वेळोवेळी दूरध्वनी करुन व सूचना करुन सुध्दा अद्याप पर्यंत प्रलंबित कराचा भरणा केलेला नाही.त्यांचे व्यवसायाचे ठिकाण मे.सुनिल फार्म इंजिनिअरिंग कं. प्रोप्रा.जाई दिपक पाटील उर्फ जाई अमर पाटील सोनवणे, सुनिल प्लाझा, जिल्हा स्टेडीयम, उस्मानाबाद येथे आहे.

सदरील व्यापा-याने उपरोक्त कर,त्यावरील व्याज व दंडाचा भरणा केलेला नाही, असे वस्तू व सेवा कर विभागाच्या महाविकास या संकेत स्थळावरुन दिसून येते. कर भरण्याबाबत त्यांना कार्यालयाकडून कारणे दाखवा नोटीस व दुरध्वनीद्वारे संपर्क साधलेला आहे. परंतु सदर व्यापा-याने प्रतिसाद दिलेला नाही. यावरुन प्रथम दर्शनी असे निदर्शनास येते की, वित्तीय वर्ष 01 एप्रिल-2013 ते 01 एप्रिल 2014 या कालावधीची उपरोक्त थकबाकी न भरुन महाराष्ट्र मुल्यवर्धित कर कायदा, 2002 च्या कलम ७४(२) अन्वये गुन्हा केल्याचे दिसते.

 सदर व्यापाऱ्यावर महाराष्ट्र मूल्यवर्धित कर कायदा 2002 मधील 74 (2) नुसार करकसुरदार ठरवून आनंद नगर पोलीस स्टेशन,उस्मानाबाद येथे वस्तू व सेवा कर विभागामार्फत राज्यकर निरिक्षक शिवनारायण माने यांनी गुन्हा दाखल केला आहे.

या कार्यवाही वस्तु व सेवाकर सोलापूर विभागाचे राज्यकर सहआयुक्त निरंजन जोशी वस्तु व सेवाकर कार्यालय उस्मानाबादचे कार्यालय प्रमुख अभिजीत पोरे व राज्यकर अधिकारी रामचंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकर निरिक्षक शिवनारायण माने यांनी केली.