फसवणूक,अपहारप्रकरणी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त अरवत यांचेवर गुन्हा नोंद करा

सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी
 

उस्मानाबाद -  उस्मानाबाद येथील समाज कल्याण सहाय्यक आयुक्त बाबासाहेब अरवत  यांनी मुख्यालयी न राहता घरभाडे भत्ता उचलून शासनाची फसवणूक व अपहार केला आहे .  यामुळे समाज कल्याणचा मनमानी व भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल  चौकशी करून गुन्हा नोंद करावा , अशी मागणी सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी  जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे . 


याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले की, उस्मानाबाद येथील समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब अरवत ते कधीही मुख्यालयी राहत नाहीत . ते  त्यांच्या खाजगी वाहनातून दररोज उस्मानाबाद - सोलापूर असा प्रवास करतात . त्यांच्या मालकीचे खाजगी वाहन ( एम एच १३ डी ई  २३२७ ) दररोज तामलवाडी टोल नाक्यावरून सकाळ -  संध्याकाळी गेल्याचा पुरावा आपणास तामलवाडी टोल नाक्यावरील अभिलेखात तसेच सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येईल . त्यांचे दररोजचे मोबाईल टॉवर लोकेशन सोलापूर ते उस्मानाबाद असे असल्याचे दिसून यईल .  


सहायक आयुक्त अरवत यांनी मुख्यालयी राहत असल्याचे भासवून शासनाची दिशाभूल व फसवणूक केली आहे.  मुख्यालयी न राहता दरमहा घरभाडे उचलून  शासकीय रकमेचा अपहार केला आहे . सहाय्यक आयुक्त अरवत यांचा कारभार एक ना अनेक कारनाम्यामुळे चर्चेत आहे. कार्यालयीन वेळेत देखील ते  बऱ्याच वेळा कार्यालयात हजर नसतात . त्यामुळे कार्यालयीन कामासाठी येणाऱ्या नागरिकांना हेलपाटे मारून बेजार व्हावे लागत आहे . 


यामुळे नागरिकातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे . समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त स्वतःच मनमानीपणे गैरकारभार करीत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांवरही त्यांचा वचक नसल्याचे दिसत आहे . त्यामुळे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त अरवत यांच्या  या गैर कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा  अशी मागणी सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी  केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी  सुभेदार यांच्या निवेदनाची दखल घेत, लातूरच्या समाज कल्याण विभागाचे उप आयुक्त यांना या संपूर्ण  प्रकरणाची चौकशी करून सात दिवसाच्या आत स्वयंस्पष्ट अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत.