अतिवृष्टी : केंद्रीय पथकाचे वरातीमागून घोडे 

तब्बल दोन महिन्यानंतर नुकसानीची केली पहाणी 

 

 उस्मानाबाद - जिल्ह्यात ऑक्टोंबर महिन्यात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. तब्बल दोन महिन्यानंतर .याच नुकसानीची पहाणी करण्यासाठी केंद्रीय पथक उस्मानाबाद जिल्ह्यात आज सोमवारी दाखल झाले होते.


उस्मानाबाद तालुक्यातील पाटोदा आणि केशेगाव येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानची पाहणी  तुषार व्यास यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या केंद्रीय पथकाने केली. या पाहणी दरम्यान औरंगाबाद विभागातील सहआयुक्त श्री अविनाश पाठक,उस्मानाबादचे जिल्हाधिकारी श्री कौस्तुभ दिवेगावकर,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, आमदार राणा जगजितसिंह पाटील ,परिषद अध्यक्षा सौ अस्मिता कांबळे ,उपविभागीय अधिकारी  योगेश खरमाटे कृषी अधिक्षक  उमेश घाडगे हेही त्यांच्यासोबत होते. 

यावेळी पाटोदा येथील जमीन वाहून गेलेल्या शेतीची पाहणी करून या पथकाने शेतकऱ्यांशी संवादही साधला तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सोयाबीन पिकांची पाहणी केली.या पथकाने उस्मानाबाद जिल्ह्यातील केशेगांव ,कांक्रंबा , कात्री आदी भागात जाऊन प्रत्यक्ष व व्हीडीओ ,फोटो पहाणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला . आता तरी लवकरात लवकर केंद्राची मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. 

या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तसेच जमिनीचे नुकसान झालेल्या शेतजमिनीच्या दुरुस्तीसाठी केंद्र सरकारच्या एनडीआरएफच्या नियमानुसार जमिनी दुरुस्ती आणि जमिनींच्या मशागतीसाठी तसेच  प्रधानमंत्री पिक विमा योजनेत अंतर्गत नियमांमध्ये शीथिलता आणून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मदत करण्याची आवश्यकता असल्याचे निवेदन आमदार  राणाजगजितसिंह पाटील यांनी पथकाकडे सुपूर्द केले.