डॉ. किरण झरकर यांचे स्किल बुक हे पेटंट प्रकाशित 

आयटीआय चे देशातील पहिले शिक्षक
 

 केंद्र शासनाच्या स्टार्टअप इंडिया अंतर्गत देशातील कौशल्य विकास व उद्योजकते साठी मोठा प्रकल्प

वाशी - शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाशी जिल्हा उस्मानाबाद येथे शिल्पनिदेशक ( कोपा) या पदावर कार्यरत असलेल्या डॉक्टर किरण प्रकाश झरकर यांचे स्किल बुक या संगणकीय प्रणालीचे पेटंट आज केंद्र शासनाच्या वतीने प्रकाशित करण्यात आले.  नेहमी आयआयटीच्या शिक्षक व विद्यार्थ्यांचे पेटंट प्रकाशित होत असते. मात्र डॉ. झरकर हे भारतातील पहिले आयटीआयचे पेटंट प्रकाशित करणारे शिल्पनिदेशक ठरले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्किल इंडिया या महत्त्वाकांक्षी योजनेला बळ देण्यासाठी डॉ. झरकर यांनी गेल्या चार वर्षापासून स्किल बुक या अत्याधुनिक संगणकिय प्रणालीवर संशोधन केले आहे. पुण्याच्या युनिक आईपीआर सर्विसेसच्या संचालिका मधुवंती केळकर यांनी पेटंट संदर्भात मार्गदर्शन केले.

स्किल बुक हे एक कोटी विद्यार्थी व शेतकरी यांना एक लाख कौशल्याशी जोडण्याचे डिजिटल माध्यम आहे. मोबाईल अप्लिकेशन, संगणक वेबपोर्टल व इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस या तिन्ही माध्यमातून ते उपलब्ध होणार आहे. स्किल बुक या उत्पादनातून मुख्यत्वे विद्यार्थी व शेतकरी यांचे एक लाख कौशल्याचे जाळे तयार करण्यात येणार आहे. यात कौशल्य प्रकाशन, प्रशिक्षण, अभ्यासक्रम, प्रमाणपत्र, नोकरी, शिकाऊ उमेदवारी, सेवा व स्टार्टअप या सुविधा सर्वांना मिळणार आहेत.

स्किल बुक या प्रकल्पास स्मित किरण पब्लिशिंग प्रा लि या कंपनीने स्टार्टअप इंडिया या केंद्र शासनाच्या उपक्रमाअंतर्गत प्रकाशित केले आहे. या प्रकल्पासाठी केंद्र शासनाच्या वतीने कंपनीस डिप प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. तसेच कंपनीची कौशल्य विकास व उद्योजकता या शिक्षण विभागासाठी पुढील दहा वर्षासाठी निवड केली आहे. स्किल बुक या प्रकल्पाच्या बोधचिन्हाचे सुद्धा यापूर्वी प्रकाशन झाले आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून शिल्पनिदेशक डॉ. झरकर यांनी तयार केलेला हा देशातील पहिलाच प्रकल्प ठरला आहे. स्किल बुक या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे अडीच हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. 

यावेळी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाहा,  संचालक दिगांबर दळवी, सहसंचालक एस. आर. सुर्यवंशी, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी रविशंकर सावळे, प्राचार्य अवधुत जाधवर, विद्यार्थी, पालक यांनी डॉ झरकर यांचे या उपक्रमासाठी अभिनंदन केले.