उस्मानाबादेत वकिलावर डॉक्टराचा प्राणघातक हल्ला

खटल्यातील वकिलपत्र काढण्याचे कारण
 
आरोपींचे वकिलपत्र न घेण्याचा ठराव

उस्मानाबाद - खटल्यातील वकिलपत्र काढून घेण्याची धमकी देत वकिलावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना शनिवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास शहरातील डी.मार्ट समोरील सोलापूर-धुळे महामार्गावर घडली. याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात आरोपी डॉ. अरूण मोरे याच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सोमवारी जिल्हा विधीज्ञ मंडळाने घटनेचा निषेध करत आरोपींचे वकिलपत्र न घेण्याचा ठराव घेतला आहे. सर्वच आरोपी फरार असून पोलीस यंत्रणा त्यांचा शोध घेत आहे.

तालुक्यातील येडशी येथील रहिवाशी असलेले ऍड. प्रथमेश सौदागर मोहिते, त्यांची बहिण डॉ. कांचन मोरे व दोन मुली या शनिवारी न्यायालयीन कामकाजासाठी न्यायालयात आले होते. आरोपी डॉ. अरूण मोरे व ऍड. प्रथमेश मोहिते यांची बहिण डॉ. कांचन मोरे यांच्या घटस्फोटाचे प्रकरण न्यायालयात सुरू आहे. शनिवारी दरतारखेप्रमाणे आरोपी डॉ. अरूण मोरे हा न्यायालयीन कक्षात आला व मुलींना भेटला. मागील तारखेस भेटण्याच्या वेळेच्या कारणावरून डॉ. मोरे याने गोंधळ घातला होता. त्यामुळे ऍड. मोहिते यांनी केवळ न्यायालयीन वेळेतच मुलींना भेटण्याची परवानगी डॉ. मोरे यास देण्याबाबत न्यायालयात अर्ज दिला.

 न्यायालयीन कामकाज संपवून ऍड. प्रथमेश मोहिते न्यायकक्षाबाहेर आले असता, डॉ. अरूण मोरे व इतर दोघांसमोर मोरे याने ऍड. मोहिते यांना ‘तू माझ्या विरोधातील वकिलपत्र काढून घे व माझ्या केसमध्ये लक्ष घालू नको. तसेच तुुझे आज काम करतो’ असे म्हणून धमकी दिली. तेंव्हा ऍड. मोहिते यांनी वकिलपत्र काढून घेणार नाही, असे सांगितले व दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास ऍड. मोहिते, डॉ. कांचन मोरे व त्यांच्या लहान दोन मुली हे महिंद्रा टीयूव्ही ३०० (क्र. एमएच २५ एएल १८००) या चारचाकी गाडीने येडशीला परत निघाले होते. न्यायालयात डॉ. अरूण मोरेसोबत असलेल्या दोघांनी त्यांच्या गाडीचा मोटारसायकलवरून पाठलाग केला.

ऍड. मोहिते यांना संशय आल्याने त्यांनी तेरणा टी-पॉइर्ंट येथून डी.मार्टच्या रस्त्याने गाडी नेली व तेथून धुळे-सोलापूर महामार्गाने गावाकडे जाण्याचा प्रयत्न केला असता, पाठलाग करणार्‍या दोघांनी त्यांच्यागाडीसमोर मोटारसायकल आडवी लावून त्यांना अडविले. दोघांनीही ‘तू डॉ. मोरेवरची केस परत घे व तुझ्या बहिणीला सांग, तू डॉक्टर मोरेचा नाद सोड’ असे म्हणून गाडीवर दगडफेक केली. या दगडफेकीत ऍड. मोहिते यांच्या ओठावर, तोंडावर दगड लागून गंभीर दुखापत झाली असून घटनेनंतर दोघेही फरार झाले. 

घटनेत ऍड. मोहिते यांच्या गाडीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांच्यासोबत असलेल्या डॉ. कांचन मोरे व त्यांच्या दोन मुली या घटनेत बचावल्या आहेत. घटनेनंतर शासकीय रूग्णालयात ऍड. प्रथमेश मोहिते यांच्यावर उपचार करण्यात आले असून रात्री उशिरा त्यांच्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलीस ठाण्यात डॉ. अरूण मोरे याच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान घटनेनंतर तिघेही फरार झाले असून पोलीस त्यांचा तपास करीत आहेत.

आरोपींचे वकिलपत्र न घेण्याचा ठराव

न्यायालयीन कामकाज पाहण्याकरिता आलेल्या वकिलाला न्यायालयात धमकी देणे व त्यांच्याबाबत मनात राग ठेवून वकिलावर प्राणघातक हल्ला करणे ही घटना निषेधार्ह आहे. त्यामुळे जिल्हा विधीज्ञ मंडळाने सोमवारी बैठक घेवून घटनेचा निषेध नोंदविला आहे. तसेच या घटनेतील आरोपींचे वकिलपत्र न घेण्याचा ठरावही घेण्यात आला असल्याची माहिती विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष ऍड. नितीन भोसले यांनी दिली आहे.