टपाल जीवन विमा एजंट पदासाठी 30 जुलै रोजी थेट मुलाखती

 

उस्मानाबाद -  भारतीय डाक विभागाकडून डाक जीवन विमा योजनेअंतर्गत लातूर आणि उस्मानाबाद जिल्हा अंतर्गत टपाल जीवन विमा आणि ग्रामीण टपाल जीवन विमा करिता थेट अभिकर्ता (डायरेक्ट एजंट) यांची नेमणूक थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. इच्छुक उमेदवाराने लातूर मुख्यालय येथील उस्मानाबाद विभाग डाकघर अधीक्षक येथे शुक्रवार दि. 30 जुलै 2021 रोजी सकाळी 11:00 ते दुपारी 4:00 या दरम्यान मुलाखती करिता उपस्थित राहावे. असे आवाहन करण्यात आले आहे.

          उमेदवाराचे वय मुलाखतीच्या दिवशी 18 वर्षा पेक्षा कमी आणि 50 वर्षा पेक्षा जास्त नसावे. उमेदवार हा ग्रामीण भागासाठी किमान इयत्ता दहावी उत्तीर्ण आणि शहरी भागासाठी इयत्ता बारावी उत्तीर्ण असावा. बेरोजगार, स्वयंरोजगार व्यक्ती, माजी जीवन विमा सल्लागार, कोणत्याही विमा कंपनीचे माजी अभिकर्ता, माजी सैनिक, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळ कर्मचारी इत्यादी टपाल जीवन विमा आणि ग्रामीण टपाल जीवन विमा करिता थेट अभिकर्ता (डायरेक्ट एजंट) या पदासाठी आवेदन करु शकतात.

          उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे व्यावसायिक कौशल्य, व्यक्तीमत्व, परस्पर संबंधाचे कौशल्य, जीवन विम्या बाबतचे ज्ञान या आधारावर केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारास पाच हजार रूपयांची अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणून ठेवावी लागेल, जी एनएससी (NSC) अथवा केव्हीपी (KVP) च्या स्वरुपात राहील तसेच परीक्षा फी 400 रुपये आणि परवाना फी 50 रुपये जमा करावी लागेल.

          प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डाक विभागाकडून तात्पुरत्या स्वरुपाचा परवाना देण्यात येईल जो आयआरडीए (IRDA) ची परवाना परीक्षा पास केल्यानंतर कायम स्वरुपाचा परवानामध्ये रुपांतरित केला जाईल. ही परीक्षा तात्पुरत्या स्वरुपाचा परवाना नियुक्तीनंतर तीन वर्षाच्या आत उत्तीर्ण करणे अनिवार्य राहील. निवड झालेल्या उमेदवारास टपाल विभागाने वेळोवेळी ठरवलेले कमीशन देण्यात येईल.

          मुलाखतीस येताना सोबत विहित नमुन्यात अर्ज आणि सर्व शैक्षणिक कागदपत्र तसेच आधार कार्ड, पॅन कार्ड, तीन पासपोर्ट साइज फोटो आणि इतर संबंधित कागदपत्र सोबत आणावेत, असे आवाहन मुख्यालय लातूर येथील उस्मानाबाद विभागाचे डाकघर अधीक्षक यांनी केले आहे.