मुक्तीसंग्राम लढ्याचा धगधगता इतिहास जागविण्यासाठी हवे धाराशिवलाही स्मारक

राणाजगजितसिंह पाटील यांची विधानसभेत आग्रही मागणी
 

मुंबई   - मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्याचे हे अमृत महोत्सवी वर्ष सुरु आहे. या लढ्यात धाराशिव जिल्ह्याने दिलेले योगदान अत्यंत मोलाचे आहे. सरकार छत्रपती संभाजीनगर येथे यानिमित्त स्मारक निर्माण करणार आहे. त्याचे स्वागतच मात्र, धाराशिवचा धगधगता इतिहास लक्षात घेता येथेही स्मारक व्हावे, अशी आग्रही मागणी करतानाच या भागात केंद्रीय विद्यापीठ, औद्योगिकरणाची गरजही आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी बुधवारी विधानसभेत अधोरेखित केली.

मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या अभिवादन प्रस्तावावर बोलताना आ. पाटील म्हणाले, सुमारे २२४ वर्षे मराठवाडा निजाम राजवटीमध्ये होता. मराठवाड्यातील जनतेने रझाकाराचे अनन्वित अत्याचार सहन केले. आर्य समाज, हिंदु महासभा व राज्य कॅंग्रेस च्या मार्गदर्शनाखाली स्थानिकांनी सत्याग्रहा सह सशस्त्र लढा देखील दिला. धाराशिव जिल्ह्यातील प्रखर विरोध पाहून चवताळलेल्या रझाकारांनी चिलवडी, नंदगाव, देवधानोरा ही गावे जाळली. स्थानिकांनी सशस्त्र लढा उभारला होता. 

सरदार वल्लभाई पटेल यांनी पोलीस ॲक्शनचा निर्णय घेतला तेव्हा नळदुर्गनजीक मोठी सैन्य कारवाई झाली. या लढ्यात शीख बटालियनचे हवालदार बचित्तरसिंग यांना हौतात्म्य आले. त्यांनी दाखवलेले अधम्य धाडस, शौर्य व दिलेल्या सर्वोच्च बलिदानामुळे त्यांना सैन्य दलाचा सर्वोच्च बहुमान अशोक चक्राने सन्मानित करण्यात आले आहे. स्वतंत्र भारताचे ते पहिले अशोक चक्र विजेते आहेत. मुक्तीसंग्रामाच्या लढ्यातील हा धाराशिवचा धगधगता इतिहास जागविण्यासाठी येथेही एक स्मारक सरकारने निर्माण करावे, अशी आग्रही मागणी आ. पाटील यांनी केली. तसेच ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी भास्करराव नायगावकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रातील काही भाग सभागृहात वाचून दाखविला.

शैक्षणिक, औद्योगिक स्तर उंचावणे आवश्यक...

धाराशिव जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न कमी असल्याने येथील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी रोजगार निर्मितीवर भर देणे आवश्यक आहे. शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी केंद्रीय विद्यापीठ धाराशिवला होण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत. मराठवाड्याच्या हिताचे निर्णय व्हावेत, यासाठी वर्षभरातून किमान एक मंत्रिमंडळ बैठक छत्रपती संभाजीनगरला घ्यावी. मराठवाड्यातील आमदारांची जिल्हानिहाय बैठक घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेत आवश्यक कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही आ. पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.

अशोकचक्र विजेत्या बचित्तरसिंह स्मारकासाठी आयडिया कॉम्पीटीशन स्वतंत्र भारतातील पहिले अशोकचक्र विजेते म्हणून शहिद बचित्तरसिंह यांची सन्मानपूर्वक नोंद घेण्यात आली आहे. मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी शहिद झालेल्या बचित्तरसिंह यांच्या स्मरणार्थ नळदुर्ग येथे उभारण्यात येणार्‍या स्मारकासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. स्वातंत्र्यलढ्याची साक्ष असलेले हे स्मारक भव्यदिव्य आणि प्रेरणादायी व्हावे यासाठी अनेकांच्या सूचना व संकल्पना महत्वपूर्ण ठरणार आहेत. त्यासाठी आयडिया कॉम्पीटीशन आयोजित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहितीही आमदार पाटील यांनी दिली आहे.