गुटखा आणि गायछाप तंबाखूचा व्यवसाय सुरु करण्यासाठी मागितली १५ हजार लाच 

शहर पोलीस स्टेशनमधील पोलीस कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात 
 
पोलीस निरीक्षक उस्मान शेख चौकशीच्या फेऱ्यात 

धाराशिव  -  धाराशिव शहरात गुटखा आणि गायछाप तंबाखूचा व्यवसाय सुरु करण्यासाठी  एका विक्रेत्यास  शहर पोलीस स्टेशनमधील पोलीस कॉन्स्टेबल महादेव  वसंतराव शिंदे यांनी दरमहा १५ हजाराची लाच मागितली होती. तडजोडीअंती १२ हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून गुन्हा दाखल  केला आहे. 

या प्रकरणी शहर पोलीस स्टेशनमध्ये जी फिर्याद देण्यात आली आहे, त्यात धक्कादायक माहिती आहे. लाचखोर पोलीस कॉन्स्टेबल महादेव  वसंतराव शिंदे म्हणतो की ,गुटखा आणि गायछाप तंबाखूचा व्यवसाय सुरु करण्यासाठी  पोलीस निरीक्षक  उस्मान शेख  यांना प्रत्येक विक्रेत्याला १५ हजार द्यावे लागतात. ट्राफिक, डीवायएसपी, एलसीबीला वेगळा हप्ता द्यावा लागेल, विशेष म्हणजे या लाचखोर पोलिसाने  शहरातील मुख्य गुटखा विक्रेत्याचीओळख करून दिली आहे. 

धाराशिव लाइव्हने गुटख्या संदर्भात जी मालिका  प्रसिद्ध केली आहे, त्याचा हा  भक्कम पुरावा आहे. शहर आणि जिल्ह्यात गुटखा, गोमांस , रेशनचा काळाबाजार,अवैध प्रवासी वाहतूक असे वेगवेगळे हप्ते सुरु आहेत. पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात वसुली सुरु आहे.