तुळजापुर-नळदुर्ग राष्ट्रीय महामार्गाची  सुधारणा करण्याची मागणी 

तुळजापुर-बार्शी राज्य मार्गाची दर्जोन्नती करुन राष्ट्रीय महामार्ग घोषीत करावा
 
आ. नितीन गडकरी यांच्याकडे मागणी 

उस्मानाबाद - आई तुळजाभवानी मातेचे तिर्थक्षेत्र सर्व बाजुंनी राष्ट्रीय महामार्गाने जोडुन येथील पर्यटनाला वृध्दी मिळावी यासाठी तुळजापुर-बार्शी राज्य मार्गाची दर्जोन्नती करुन राष्ट्रीय महामार्ग घोषीत करावा, तसेच तुळजापुर-नळदुर्ग राष्ट्रीय महामार्गाच्या सुधारणे करीता निधी मंजुर करावा, अशी मागणी आ.राणाजगजितसिंह पाटील  यांनी केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

बार्शी-तुळजापूर-नळदुर्ग राज्यमार्ग क्रं.२०६ म्हणून ओळखला जातो. या राज्य मार्गा पैकी तुळजापूर-नळदुर्ग यापूर्वीच राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आला आहे. आई तुळजाभवानी मातेचे मुंबई-पुणे कडुन येणारे अनेक भाविक भक्त बार्शी मार्गेच तुळजापूरला येतात. बार्शी शहर कृषी क्षेत्रातील मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. तसेच बार्शी शहरा मध्ये भगवंताचे प्रसिध्द मंदिर असून आषाढी वारीच्या काळात मराठवाड्यातून येणाऱ्या संत मुक्ताई व संत एकनाथ महाराजाच्या पालख्या परतीच्या प्रवासात भगवंताचे दर्शन घेऊन वारीची सांगता करतात. हा मार्ग मोठा रहदारीचा व महत्वपूर्ण आहे. तुळजापूर - बार्शी हा अस्तित्वातील राज्य मार्ग असल्याने जास्तीच्या भूसंपादनाची आवश्यकता भासणार नाही.

तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५२ मधील नळदुर्ग ते अक्कलकोट रस्त्याच्या सुधारणेचे काम जवळपास संपत आले असुन नळदुर्ग ते तुळजापुर रस्त्याचे काम पुर्ण केल्यास तुळजापुर व अक्कलकोट तिर्थक्षेत्रे चांगल्या रस्त्याद्वारे जोडली जातील. यामुळे भावीक भक्तांसह प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

त्यामुळे या बाबींचा विचार करून तुळजापुर-बार्शी राज्य मार्गाची दर्जोन्नती करुन राष्ट्रीय महामार्ग घोषित करावा, तसेच तुळजापुर-नळदुर्ग राष्ट्रीय महामार्गाच्या सुधारणे करता निधी मंजुर करावा अशी मागणी आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी .नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.  तसेच या व जिल्ह्यातील इतर मागण्यांच्या अनुषंगाने जिल्ह्यातील शिष्टमंडळासह केंद्रीय मंत्री नामदार नितीनजी गडकरी साहेब यांची देखील भेट घेणार आहे, असे आ. पाटील यांनी सांगितले.