दणका : तुळजापूरच्या कुतवळ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा परवाना रद्द
तुळजापूर - प्रतीक्षा पुणेकर मृत्यू प्रकरणी अखेर कुतवळ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन परवाना रद्द करण्यात आला आहे. याबाबतचा आदेश जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय पाटील यांनी काढला आहे.
मिळालेल्या माहितीनूसार, तुळजापूर शहरातील वेताळनगर भागात राहणारे प्रकाश पुणेकर व संजीवनी पुणेकर हे दाम्पत्य राहात आहे. त्यांना प्रतीक्षा नावाची एकुलती एक मुलगी होती. दरम्यान, हिला उलटी होऊन पोटात दुखत असल्याच्या कारणाने शहरातील कुतवळ हॉस्पिटलमध्ये ४ फेब्रुवारी २०२० रोजी दाखल करण्यात आले होते. चार दिवस कुतवळ हॉस्पिटलमध्ये मुलीला ठेवण्यात आले. त्यानंतर ८ फेब्रुवारी २०२० ला पहाटे अचानक प्रतीक्षाला सोलापूरला नेण्यास डॉक्टरांनी सांगितले.
दुर्दैवाने त्याच दिवशी मुलीचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुलीच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा आरोप करत डॉ. दिग्विजय कुतवळ यांच्याविरुद्ध तिच्या पालकांनी वारंवार तक्रारी दिल्या. मात्र, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई झाली नाही. यामुळे मुलीच्या नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेत स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिच्या नातेवाईकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला होता.
त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी एक चौकशी समिती गठीत केली होती. या चौकशी समितीने कुतवळ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलवर ठपका ठेवला होता. रुग्णाचा मृत्यू हा pulmonary odema मुळे झाल्याचे निरीक्षण नोंदवले होते.