उस्मानाबादच्या एस. टी. महामंडळाला कोरोनाचा फटका ...

 

 ६७० बसच्या फेऱ्या रद्द ... ३० ते ३५ लाख रुपयांचा फटका...


उस्मानाबाद : कोरोना व्हायरसचा फटका  उस्मानाबादच्या एस. टी. महामंडळालाही बसला आहे.  विषाणूच्या प्रादुर्भावाने शहरासह जिल्ह्यातील बसस्थानके ओस पडत असून गेल्या सात दिवसांत एसटी महामंडळाच्या उस्मानाबाद विभागाला तब्बल ६७० फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. यातून लाखो रुपयांचा फटका बसला आहे.

गेल्या बुधवारपासून (ता. ११) महामंडळाच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे. सातत्याने प्रवासी संख्या कमी होत आहे. दोन-तीन दिवसांपासून प्रवासी संख्या चांगलीच रोडावली आहे. गेल्या सात दिवसांत तब्बल ६७० बसच्या फेऱ्या रद्द झाल्या आहेत. म्हणजेच तब्बल एक लाख पाच हजार किलोमीटरचा प्रवास थांबला आहे.

त्यामुळे जिल्ह्याच्या एसटीच्या विभागाला तब्बल ३० ते ३५ लाख रुपयांचा फटका बसला आहे. दरम्यान, दोन दिवसांपासून तर महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. मोठ्या प्रमाणात असलेल्या कर्मचाऱ्यांना काम नाही. शिवाय त्यांचा पगार देणे गरजेचे आहे. त्यामुळे जिल्ह्याला लाखोंचा फटका सहन करावा लागत आहे.

लांबपल्ल्याच्या गाड्यांच्या फेऱ्यात १५ टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. तर ग्रामीण भागात जास्त फटका बसत असून ४० टक्के फेऱ्या रद्द केल्या आहेत. सध्या ज्या भागात जाण्यासाठी प्रवासी आहेत, त्याच मार्गावर बस सुरू करण्यात आल्या आहेत. प्रवाशांची मागणी बघून सेवा दिली जात आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी शहर बसस्थानकाची प्रत्येक दोन तासाला स्वच्छता केली जात आहे; तसेच बसची स्वच्छता केली जात असून निर्जंतुकीकरण केले जात आहे. प्रवाशांचा आणि वाहक-चालकांचा संपर्क होऊ नये, यासाठी चालक-वाहकांना मास्क दिले जाणार आहेत. असे जिल्हा वाहतूक नियंत्रण अधिकारी,ए. ए. जानराव यांनी सांगितले.