वाशीतील जादूटोणा प्रकरणाची सखोल चौकशी करा

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीची मागणी
 

धाराशिव -  आपल्या अंगात देवी असून, भूतबाधा, जादूटोणा करणार्‍यापासून वाचवतो, असे सांगून लोकांवर अघोरी प्रकार करणार्‍या भोंदूबाबाचा पोलिसांनी 10 ऑगस्ट रोजी भांडफोड केला होता. या प्रकरणी पोलिसांनी केवळ दोघांना ताब्यात घेवून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचे मोठे जाळे असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.

वाशी तालुक्यातील इंदापूर परिसरात सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये बोरी शिवारातील हजरत खाँजा शेख फरीद शेकरगंज या दर्ग्याच्या शेजारी शहजारवली ऊर्फ अहमद पाशा सय्यद (34 वर्षे रा. नांदगाव बोरी ता. वाशी) व साहित्य विक्री करणारा ताजोद्दीन अहमद शेख (45 वर्षे रा. नांदगाव बोरी ता.वाशी) हे सामान्य लोकांना माझ्या अंगात दैवी शक्ती आहे. मी जादूटोणा कारणार्‍यांपासून, भुतबाधा होण्यापासून वाचवितो, असे सांगून सामान्य लोकांची आर्थिक लूट करीत होते. अंनिसच्या माहितीनुसार पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या भोंदूबाबाच्या अघोरी कृत्याचा आवाका मोठा आहे. 

या गुन्ह्यात दोनपेक्षा अधिक आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता आहे. तसेच याप्रकरणात मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याचा अंनिसला संशय आहे. त्यामुळे याप्रकरणाची सखोल चौकशी करावी. गुन्ह्यात सामील असलेल्या सर्व आरोपींंचा शोध घेवून त्यांच्याविरूध्द तत्काळ कडक कारवाई करावी, अशी मागणी अंनिसने केली आहे.पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनावर अंनिसचे अ‍ॅड. देवीदास वडगावकर, मुकुंद सुनील शिंदे, शितल वाघमारे यांची स्वाक्षरी आहे.