घटस्थापनेने श्री तुळजाभवानी देवीजींचा नवरात्र महोत्सवास प्रारंभ
उस्मानाबाद - महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास तुळजापूर येथे गुरुवार धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला. श्री तुळजाभवानी मंदिरात पहाटे पारंपरिक पध्दतीने श्री तुळजाभवानी देवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर दुपारी 12 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी श्री कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते आज विधिवत घटस्थापना करण्यात आली. मंत्रोच्चाराने, आई राजा उदो-उदोचा जयघोष आणि संबळाच्या साथीने सर्व पुजाविधी करण्यात आले.
त्यानंतर घटकलशाची पारंपरिक पध्दतीने पुजा करुन गोमुख तिर्थापासून या घटकलशांची मिरवणूक काढण्यात आली. मंदिरातील गाभाऱ्यात तसेच खंडोबा मंदिर, यमाईदेवी मंदिर, टोळभैरव आणि आदिमाया आदिशक्ति या मंदिरामध्ये जिल्हाधिकारी श्री. कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली.
मंदिर व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने भाविकांच्या दर्शनाच्या सोयीसाठी मंदिर संस्थानचे अधिकृत संकेत स्थळावर(www.shrituljabhavani.org) ऑनलाईन दर्शन व्यवस्था करण्यात आली असून भाविकांनी दर्शन सुविधेचा लाभ घरी बसूनच घ्यावा , असे आवाहन करुन सर्व भाविकांना शारदीय नवरात्र महोत्सवाच्या शुभेच्छा यावेळी दिल्या.
यावेळी मंदिरातील धार्मिक कार्यक्रमास आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी जि.प. उपध्यक्षा अर्चनाताई पाटील, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) योगिता कोल्हे, तहसीलदार श्री. सौदागर तांदळे, मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक सिध्देश्वर इन्तुले, जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे, जयसिंग पाटील, महंत तुकोजी बुवा, महंत हमरोजी बुवा, महंत चिलोजी बुवा, पाळीकर पुजारी मंडळ, उपाध्ये मंडळ, भोपे पुजारी मंडळाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.