दिलासा : उस्मानाबाद जिल्ह्यात २७७ गावांमधून कोरोना गायब

 

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.  जिल्ह्यातील २७७ गावांमध्ये ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या शून्यावर आली आहे तर केवळ चार रुग्ण असणारी गावे २९७ आहेत.


जिल्ह्यात मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून ग्रामीण भागात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत होती. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुमारे १५२ गावे कोरोनाने घेरलेली होती. यामध्ये दहापेक्षा अधिक रुग्ण होते तर तितक्याच गावांमध्ये पाचपेक्षा अधिक रुग्ण होते.


या पार्श्वभूमीवर दोन आठवड्यात जनता कर्फ्यूचे आदेश देण्यात आले. याचा परिणाम दिसून आला असून पॉझिटिव्हिटी रेट ३१ वरून १८ टक्क्यांवर घसरला आहे. यामध्ये शून्य ॲक्टिव्ह रुग्णसंख्या असलेली गावे २७७ आहेत तर एक ते चार रुग्णसंख्या असणारी गावे २९७ आहेत. पाच ते नऊ एक संख्या असणारी गावे १२४, दहापेक्षा अधिक रुग्ण संख्या असलेली गावे ११९ आहेत. माझे कुटुंब माझी जबाबदारी टप्पा तीन राबविल्यामुळे लक्षणे असणारे कोरोना रुग्ण सापडून संसर्गाचे प्रमाण कमी झालेले दिसत आहे.

नागरिकांनी जनता कर्फ्यूचे जिथे काटेकोर पालन केले ती गावे आता कोरोनामुक्त दिसून येत आहे. सद्यस्थितीत ४७३२ रुग्णसंख्या कमी झाली आहे. मात्र, ऑक्सिजनवरील रुग्णांची संख्या ८२२ आहे. मध्यम ते गंभीर रुग्णांची संख्या घटली असली तरी ही घट केवळ पंधरा टक्के आहे. यामुळे आजार अंगावर न काढता लक्षण असलेल्या रुग्णांची चाचणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


सोमवारपासून आरटीपीसीआरच्या तपासण्या तब्बल दुपटीने वाढणार
 

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट थोपविण्यासाठी जिल्हा स्तरावर प्रशासनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. विद्यापीठ उपकेंद्राच्या प्रयोगशाळेतील आरटीपीसीआर मशीनची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. त्यामुळे सध्या ५०० ते ६०० पर्यंत असलेल्या तपासण्या आता १२५० ते दीड हजारांपर्यंत जाऊ शकतात. शिवाय जिल्ह्यात अँटिजेन टेस्टचे प्रमाणही वाढवण्याचे नियोजन असल्याने दोन्ही मिळून दररोज ३ हजारांपेक्षा अधिक तपासण्या केल्या जाऊ शकतात. सोमवारपासून पूर्ण क्षमतेने तपासण्या वाढविण्यात येणार आहेत.

दाेन महिन्यांपासून वाढत्या रुग्णसंख्येमुले तपासण्या वाढवल्या होत्या. परंतु, त्यात रॅपिड अँटिजेनचे प्रमाण अधिक हाेते. विद्यापीठ उपकेंद्रातील आरटीपीसीआर मशीनची एका राऊंडची क्षमता १८४ होती. त्यात दररोज क्षमता वाढवून ६०० तपासण्या केल्या जात आहेत. मात्र, जिल्हा प्रशासनाने ४९ लाख रुपये खर्चून या मशीनची क्षमता वाढविली आहे. मशीनच्या ट्रायल सुरू आहेत. त्यासाठी लागणाऱ्या अन्य सामग्रीची ऑर्डर दिली आहे. या नव्या क्षमतेनुसार दररोज ७५० अतिरिक्त तपासण्या होऊ शकतात. िनदान हेच सूत्र लक्षात घेऊन प्रशासनाकडून तपासण्यांवर भर दिला जाणार आहे. अाता तिसरी लाट राेखण्यासाठी दरराेज दोन्ही प्रकारच्या मिळून किमान ३ हजारांवर तपासण्या करण्यात येणार अाहेत. ५० टक्के आरटीपीसीआर तर ५० टक्के अँटिजेन टेस्ट होतील


जिल्ह्यात आतापर्यंत पावणेतीन लाख नागरिकांच्या काेरोना चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी उस्मानाबादेतील या प्रयोगशाळेत आतापर्यंत आरटीपीसीरच्या तब्बल ५९ हजार तपासण्या झाल्या आहेत.यापैकी ११ हजार चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.जिल्ह्यात याआधी आरटीपीसीआर तपासण्यांची सोय नव्हती. औरंगाबाद, पुणे, सोलापूर, लातूर आदी ठिकाणी तपासण्या होत होत्या. त्यानंतर अँटिजेन टेस्ट किट उपलब्ध झाल्याने आरटीपीसीआरवरील ताण कमी झाला.अलीकडे मात्र अँटिजेन टेस्टबद्दल नागरिकांमध्ये संभ्रम वाढत असल्याने आरटीपीसीआर तपासण्यांवर भर दिला जात आहे. त्यामुळे मशीनची क्षमता वाढविण्यात आली आहे.


सध्या प्रयोगशाळेत १० प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे. सध्या दिवसाची टेस्ट क्षमता ६०० आहे. वाढलेल्या क्षमतेनुसार आणखी ५ प्रयोगशाळा तंत्रज्ञ आवश्यक आहेत. कर्मचारी वाढविण्यात येणार असून, दोन दिवसांत दररोज २०० प्रमाणे तपासण्या वाढवणे सुरू आहे. सोमवारपासून दररोजची क्षमता १५०० पर्यंत जाऊ शकते, असे प्रयोगशाळेचे व्यवस्थापक डॉ. प्रशांत दीक्षित यांनी सांगितले.