जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी केली कृषि सेवा केंद्राची अचानक तपासणी

 

उस्मानाबाद - शहरातील कृषी वस्तु भांडार, बार्शी नाका, उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी भेट देवून बियाणे,खते, किटक नाशके उपलब्धता, विक्रीबाबत माहिती घेवून उपस्थित शेतक-यांशी संवाद साधला.

      जिल्हयास पेरणी क्षेत्रानुसार महाबीजकडून 12000 क्विंटल सोयाबीन बियाणे पुरवठा झालेला असून महाबीजचे सोयाबीन बियाणाचे दर खाजगी कंपनीपेक्षा कमी असल्याने महाबीज बियाणेची शेतक-यांकडून मागणी जास्त आहे. त्यानुसार महाबीजकडे सोयाबीन पुरवठा करणेबाबत  प्रयत्न चालू असून आजअखेर कृषी सेवा केंद्रात महाबीज सोयाबीन बियाणे उपलब्धता कमी असली तरी खाजगी सोयाबीन बियाणे कंपन्याचा पुरवठा जिल्हयात मुबलक आहे. शेतक-यांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही असे श्री. दिवेगावकर यांनी सांगितले.
    
   शेतक-यांनी बियाणे उगवणशक्ती तपासून व बियाण्याला बिज प्रक्रिया करुनच पेरणी करण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय म्हणजे 75 ते 100 मि.मी पाऊस झाल्यानंतर पेरणी करावी, असेही त्यांनी सांगितले.


 कृषी सेवा केंद्रामार्फत उपलब्ध असलेले विविध कंपन्याचे सोयाबीन बियाण्यांबाबत उगवणशक्ती प्रात्यक्षिक पाहणी केली. त्याचप्रमाणे अनुदानित खताचा वापर पॉस मशीनद्वारे होत असल्याची तसेच केंद्र शासनाने दि. 20 मे-2021 रोजी अनुदानित खतास वाढीव अनुदान जाहीर केले असल्याने सुधारित दराने खताची विक्री होत असल्याची व कृषी सेवा केंद्र व गोदामात उपलब्ध असलेले बियाणे, खते यांची दरफलकावर अद्ययावत साठयाची नोंद इ.बाबत तपासणी केली.
    
 यानंतर इतरही कृषी सेवा केंद्राची प्रत्येक तालुक्यात रॅन्डम तपासणी करणार असल्याचे सांगितले. शेतक-यांना  बियाणे, खताबाबत काही अडचण असल्यास कृषी विभागाने जाहीर केलेल्या 02472-223794 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे तसेच तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती कृषी अधिकारी यांचेकडे लेखी तक्रार देण्याचे सांगितले.

शेतक-यांना कृषी निविष्ठा दर्जेदार व रास्त दरात मिळण्याकरिता बियाणे,खते,किटकनाशक कायद्यानूसार निरीक्षकांनी नमूने घेवून प्रयोगशाळेत तपासणीस पाठविणे व भरारी पथकामार्फत कृषी सेवा केंद्राची तपासणी करण्याचे निर्देश दिले.

    यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यु.आर.घाटगे,कृषी विकास अधिकारी जि.प टी.जी.चिमनशेटटे, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक सी.जी.जाधव, पंचायत समिती कृषी अधिकारी बी.आर.राऊत, व्ही.एस.निरडे उपस्थित होते.