नळदुर्गजवळ ट्रकचा धक्का लागल्याने क्लिनरचा खून 

खुनाचा आरोपी १४ तासांत अटकेत
 

नळदुर्ग: गंधोरा शिवारातील ‘रुद्र हॉटेल’ समोर  ट्रकचा स्प्लेंडर मोटारसायकलीस धक्का लागल्याने मोटारसायकल चालकाने  ट्र्क चालकास आणि क्लिनरला लोखंडी गजाने बेदम मारहाण केली, त्यात क्लिनरचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील आरोपीस पोलिसांनी १४ तासांत अटक केली आहे.  

ट्र्क  चालक- सहदेव मधुकर ढाकणे व सहायक- गणेश सांगळे, दोघे रा. शिरुरकासार, ‍जि. बीड हे दि. 28.12.2020 रोजी 13.30 वा. नळदुर्ग- तुळजापूर रस्त्यावर ट्रक क्र. के.ए. 63- 1222 हा चालवत जात होते. यावेळी गंधोरा शिवारातील ‘रुद्र हॉटेल’ समोर त्यांच्या ट्रकचा धक्का रस्त्याने जाणाऱ्या एका विना क्रमांकाच्या स्प्लेंडर मोटारसायकलीस लागला. यावर त्या अज्ञात दुचाकी स्वाराने ट्रक चालक- ढाकणे व सहायक- गणेश सांगळे यांना लोखंडी गजाने मारहाण केल्याने गणेश सांगळे यांच्या डोक्यास गंभीर दुखापत होउन त्यांचा मृत्यु झाला तर ढाकणे हे गंभीर जखमी झाले. यानंतर तो अज्ञात स्वार वाहनासह पसार झाला. यावरुन नळदुर्ग पो.ठा. येथे पोहेकॉ- जितेंद्र कोळी यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन अज्ञात आरोपीविरुध्द भा.दं.सं. कलम- 302, 307 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.

घटनेचे गांभीर्य पाहून प्रभारी पोलीस अधीक्षक संदीप पालवे यांसह उपविभागीय पोलीस अधिकारी  विशाल खांबे यांनी घटनास्थळी भेट दिली. तपासात पोलीसांना समजले की, त्या विनाक्रमांकाच्या स्प्लेंडर वरील अज्ञात मोटारसायकल स्वार हा त्या अपघातात किरकोळ जखमी झालेला आहे. यावर नळदुर्ग पो.ठा. चे सपोनि- जगदीश राऊत यांच्या पथकाने तपासाची दिशा रुग्णालयांकडे वळवली. नळदुर्ग, तुळजापूर येथील रुग्णालये धुंडाळून एखादा जखमी तरुण उपचारास आला होता काय ? याची रुग्णालयांत माहिती घेण्यात आली. अखेर तो तरुण तुळजापूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारकामी दाखल असल्याचे समजताच पथकाने आज रात्री 02.30 वा. आरोपी- सुदर सतिश गवळी, वय 24 वर्षे, रा. वडगाव (देव.), ता. तुळजापूर यास रुग्णालयातून अटक केले आहे.

पाहिजे असलेला आरोपी अटकेत

उस्मानाबाद (श.) पो.ठा. गु.र.क्र. 257 / 2007 या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी- मनोज मुरलीधर सावंत, रा. सांजा, ता. उस्मानाबाद हा जामीनावर सुटल्यानंतर सुनावणी प्रसंगी गैरहजर राहत होता. त्याचा ठावठीकाणा पोलीसांना मिळुन येत नसल्याने गेली 6 वर्षे पोलीस त्याचा शोध घेत होते. तपासा दरम्यान तो सातारा जिल्ह्यात राहत असल्याचे समजल्याने सपोनि- निलंगेकर, पोकॉ- पांडुरंग सावंत, अशोक ढगारे यांच्या पथकाने आज दि. 29.12.2020 रोजी त्यास सातारा जिल्ह्यातून ताब्यात घेउन उर्वरीत तपासकामी उस्मानाबाद (श.) पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.