ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध पार पाडा आणि घ्या २५ लाखाचा विकास निधी...

शिवसेना आ.कैलास पाटील यांचे बक्षीस जाहीर 

 


उस्मानाबाद - उस्मानाबाद-कळंब  मतदार संघातील ज्या गावची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध पार पडेल, त्या  गावास आमदार निधी व इतर निधीतून २५ लाख रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून देणार असल्याचे शिवसेना आ.कैलास  पाटील यांनी जाहीर केले आहे. 

सन  २०२० मध्ये मुदत संपलेल्या राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान होणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक म्हणले की, वैयक्तिक हेवे देवे, तंटे या अशा गोष्टी कितीही टाळायच्या म्हणले तरी टाळता येत नाहीत. या हेव्यादेव्यानेच गावाचा विकास खुंटतो. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्यास तंटे उदभवणार नावणार नाहीत व गावाच्या विकासासाठी चालना मिळेल. 

ग्रामपंचायत निवडणुका टाळाव्यात सदस्य बिनविरोध निवडले जावेत यासाठी आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे अध्यक्ष .पोपटराव पवार यांनी आपले आयुष्य वेचले आहे. हिवरे बाजार आणि भास्करराव पेरे पाटील यांच्या पाटोदा या गावांचा आदर्श मतदारसंघातील गावानी घेतला तर नक्कीच एक चांगली सुरवात होईल, असा ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ता कोणाची येते हा विषय इर्षेचा असतो परंतु बर्‍याचदा यातील वाद, तंटे हे निवडणूकीनंतरही कायम राहतात त्याचा परिणाम विरोधाला विरोध करण्याची मानसिकता बळावते.

 हे सर्व टाळण्यासाठी निवडणुका बिनविरोध व्हाव्यात शिवाय कोरोनाच्या काळात गावात एकोपा टिकून राहावा एवढाच उद्देश आहे. यातुन ग्रामविकासासाठी चालना मिळावी व सध्याचे कोरोनाचे संकट बळावू नये याशिवाय गेल्या मार्च पासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रयत्न करत राहिलेल्या प्रशासनावर ताण येऊ नये. निवडणूक खर्चाची बचत व्हावी आदी बाबींचा विचार करून माझ्या मतदार संघातील ज्या ग्रामपंचायतिची निवडणूक बिनविरोध होईल त्या ग्रामपंचायतींना आमदार निधी व इतर निधीतून २५ लाख रुपये उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. याच्या माध्यमातून गावातील विकासकामे मार्गी लावता येतील. अधिकाधिक ग्रामपंचायत बिनविरोध निघाव्यात यासाठी मतदार संघाचा सेवक म्हणून हा माझा छोटासा प्रयत्न आहे, असे आ. पाटील यांनी सांगितले.