न्यूमोकोकल कॉन्जुगेट लसीच्या मोहिमेस उस्मानाबाद येथे सुरुवात

या लसीमुळे बालकांमधील न्यूमोकोकल आजार आणि त्यामुळे होणारे मृत्यू टळू शकतात
 

उस्मानाबाद -  न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन या लसीचा नियमित कार्यक्रमात समावेश करण्यात आलेला आहे. ही लस जिल्ह्यातील सर्व शासकीय लसीकरण केंद्रावर आजपासून मोफत मिळणार आहे.

 र्स्ट्रेप्टोकोकस न्युमोनी बॅक्टेरीयामुळे होणारा न्युमोनिया हा पाच वर्षाच्या आतील बालकांमधील न्युमोनियाचे प्रमुख कारण आहे. न्यूमोकोकल न्युमोनिया हा श्वसन मार्गाला होणारा एक संसर्ग आहे. ज्यामुळे फुप्फुसांवर सूज येवून त्यात पाणी भरु शकते. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. खोकला, धाप लागणे, श्वास घ्यायला त्रास होणे इत्यादी या आजाराची लक्षणे आहेत.जर आजार गंभीर असेल तर मुलांना खाण्या-पिण्यात अडचण येवू शकतात, फिट येवू शकते, बेशुध्द होवू शकतात आणि मृत्यू देखील होवू शकतो.

पीसीव्ही या लसीकरणामुळे बालकांमधील न्यूमोकोकल आजार आणि त्यामुळे होणारे मृत्यू टळू शकतात. गंभीर न्यूमोकोकल आजार होण्याचा धोका दोन वर्षापर्यंतच्या बालकांमध्ये दिसून येतो. परंतु एक वर्षाच्या आतील बालकांमध्ये तो धोका सर्वात अधिक असतो. पीसीव्ही लसीकरणाने या गंभीर न्यूमोकोकल आजारापासून बालकांचे संरक्षण तर होईलच पण सोबतच समाजातील इतर घटकांमध्ये न्यूमोकोकल आजाराचा धोका कमी होईल. न्यूमोकोकल आजार टाळण्यासाठी पीसीव्ही लसीकरण हा सगळ्यात कमी खर्चीक व प्रभावी उपाय आहे.

सार्वत्रिक लसीकरण मोहिमेत बालकांना पीसीव्ही लसीचे तीन डोस :- पहिला डोस सहाव्या आठवड्यात, दुसरा डोस चौदाव्या आठवड्यात आणि बुस्टर डोस नऊ महिने या वयात दिला जाणार आहे. न्यूमोकोकल आजारापासून संरक्षण मिळविण्यासाठी सर्व पात्र बालकांना हे तिनही डोस मिळतील याची खात्री करुन घ्यावी.

या पीसीव्ही लसीकरणाचा नियमित लसीकरणात समावेशाचा जिल्हास्तरीय शुभारंभ येथील स्त्री रुग्णालयात आज करण्यात आला.या प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.डी.के.पाटील, जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ.कुलदीप मिटकरी, निवासी वैद्यकीय अधिकारी (बा.सं.), डॉ.सचिन बोडके, स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीमती गवळी, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीमती शैलजा ठोंबरे, डॉ.सोनटक्के, डॉ. माने, डॉ. मिनीयार, अधिसेविका श्रीमती सुमित्रा गोरे,श्रीमती देशमुख,श्रीमती भाटे, अधिपरिचारिका श्रीमती दाने यांच्यासह आरोग्य कर्मचारी मोठया प्रमाणात उपस्थित होते. न्यूमोकोकल आजार टाळण्यासाठी पीसीव्ही लसीकरण हा सगळयात कमी खर्चीक व प्रभावी उपाय असल्याने जिल्हयातील सर्व पात्र बालकांना ही लस द्यावी,असे आवाहन डॉ.पाटील व डॉ.मिटकरी यांनी केले आहे.