मोहा येथे विदेशातून आलेले दोघे ऑमायक्रॉन पॉझिटिव्ह

उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण पाच रुग्ण ऑमायक्रॉन पॉझिटिव्ह
 
 नागरिकांनी सतर्क राहुन कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे आवाहन

  उस्मानाबाद -राष्ट्रीय विषाणू संस्था (प्रयोगशाळा ) (NIV), पुणे यांच्याकडुन दि.23 डिसेंबर-2021 प्राप्त झालेल्या अहवालानुसार उस्मानाबाद जिल्हयातील मोहा (ता. कंळब) येथील दोन व्यक्ती ऑमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.यापैकी एक 31 वर्षीय पुरुष आणि दुसरा रुग्ण हा दोन वर्षीय बालक आहे. या 31 वर्षीय पुरुष हा घाणा या देशातून दि.13 डिसेंबर-2021 रोजी आलेला आहे.दुसरा रुग्ण संबंधिताचा मुलगा आहे.


उस्मानाबाद जिल्ह्यात यापूर्वी बावी (ता.उस्मानाबाद) येथे  ऑमायक्रॉनचे  दोन रुग्ण  पॉझिटिव्ह आढळले होते. जिल्ह्यात एकूण ५ जण  ऑमायक्रॉन रुग्ण उपचार घेत आहेत. 

        जिल्हयात आजापर्यंत 98 व्यक्ती परेदशातून आलेल्या आहेत. आरोग्य विभागामार्फत संबंधित व्यक्तींचे ट्रेसीग आणि टेस्टींग करण्यात आलेले आहे.परदेशातून आलेल्या व्यक्तींची कोविड आरटीपीसीआर तपासणी करण्यात आलेल्या आहेत.यामध्ये जे रुग्ण कोविड बाधीत आढळून आले आहेत. त्याचे नमुने राष्ट्रीय विषाणू संस्था (प्रयोगशाळा) (NIV),पुणे येथे पाठविण्यात आलेले आहेत.यामध्ये आतापर्यंत जिल्हयात एकूण पाच ओमायक्रॉन बाधीत रुग्ण आढळून आलेले आहेत.त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथे उपचारासाठी ठेवण्यात आले आहे.

        या पार्श्वभुमीवर जिल्हयातील आरोग्य यंत्रणा सतर्क झालेली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता नियमितपणे मास्क वापरणे,गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे,शारीरिक अंतर पाळावे,ज्या नागरिकांनी कोविड 19 लस अद्याप घेतलेली नाही.त्यांनी त्वरित कोविड 19 लस घ्यावी,परदेशातून आलेल्या प्रवाशांनी गृह विलगीकरणात अथवा संस्थात्मक विलगीकरणात रहावे, तसेच परदेशातून आल्यावर वेळीच प्रशासनास अवगत करावे.    

    आरोग्य विभागास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय पाटील, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवकुमार हलकुडे यांनी केले आहे.