बोगस बंगाली डॉक्टरावर मुरुममध्ये गुन्हा दाखल 

अचलेरध्ये करीत होता अवैध वैद्यकीय व्यवसाय 
 

  लोहारा - लोहारा तालुक्यातील  मौजे अचलेर येथे अवैध वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या सागर गोकुळ भद्रा (उर्फ बंगाली) बोगस बंगाली डॉक्टरावर आज  रंगेहाथ पकडून मुरूम पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.कोरोना संकट काळात तो रुग्णाची लूट करीत होता. 

      मौजे अचलेर येथील रहिवासी विष्णू लोहार यांनी यासंदर्भात लेखी तक्रार केली होती. त्यानंतर अवैध वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस बंगाली डॉक्टराविरूद्ध कार्यवाही साठी पथक तयार करण्यात आले आणि त्याच्यावर नजर ठेवण्यात आली. 

      मंगळवारी गटविकास अधिकारी सोपान अकेले, सहा. गटविकास अधिकारी संजय ढाकणे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, वाहन चालक राजू कांबळे  हे प्रा. आ. केंद्र, आष्टा कासार येथे कोविड लसीकरण केंद्रास भेट देण्यासाठी गेले असता, अचलेर येथे राजरोसपणे बोगस बंगाली डॉक्टर उपचार करीत असल्याबाबत  माहिती मिळाली. 

त्यानंतर मुरूम पोलिस स्टेशन येथे संपर्क साधून पोलिस कॉन्स्टेबल संजय नायकल यांना अचलेर येथे बोलावण्यात आले आणि सर्व पथकाने अचानकपणे धाड टाकून सदर इसमास रुग्णावर उपचार करताना रंगेहाथ पकडले. तसेच सर्व ऐवज जप्त करण्यात आले व त्यास मुरूम पोलिस स्टेशन येथे नेण्यात आले व रात्री ऑनलाईन FIR करून गुन्हा दाखल करण्यात आला.


सद्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. नागरिकांनी शासकीय रुग्णालय अथवा नोंदणीकृत खाजगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टर कडूनच उपचार घ्यावेत. अनाधिकृत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या लोकांकडून उपचार घेऊन स्वतः चा तसेच इतरांचा जीव धोक्यात आणू नये. शॉर्टकट खूप महागात पडू शकतो हे लक्षात ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

गुन्हा दाखल 

सागर गोकुळ भद्रा, वय 44 वर्षे, रा. खरोगोरजमठ, ता. हब्रा, जि. चोविसपरगाना, राज्य- पश्चिम बंगाल यांनी त्यांच्याकडे कोणताही वैद्यकीय व्यवसाय करण्याचा व औषध बाळगण्याचा वैध परवाना नसतांना मागील 10- 12 वर्षांपासुन अचलेर, ता. लोहारा येथे दवाखाना उघडून अचलेर येथील रुग्णांवर उपचार करत असतांना दि. 25 मे रोजी 12.20 वा. सु. लोहारा तालुका आरोग्य अधिकारी- डॉ. अशोक कटारे यांना आढळले. यारुन श्री अशोक कटारे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेरुन सागर भद्रा यांच्याविरुध्द महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टीशनर कायदा कलम- 33 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.