बेंबळी : लोकवर्गणीतून साकार झालेल्या पहिल्या कोविड केअर सेंटरचे लोकार्पण

 



उस्मानाबाद -  तालुक्यातील बेंबळी येथे लोकवर्गणीतून साकार झालेल्या कोविड केअर सेंटरचे लोकार्पण आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते गुरुवारी ( दि.. २२) करण्यात आले. ग्रामीण भागातील लोकवर्गणीतून साकार झालेले हे जिल्ह्यातील पहिले कोविड केअर सेंटर आहे.


दक्षता फाउंडेशन या संस्थेच्या पुढाकारातून बेंबळी येथील जिल्हा परिषद शाळेत कोविड केअर सेंटर साकारण्यात आले आहे. येथे ५० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. या सेंटरचे लोकार्पण गुरुवारी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी कोविड केअर सेंटरची उभारणी केल्यामुळे दक्षता फाऊंडेशनच्या सर्व पदाधिकऱ्यांचा व सदस्यांचा सत्कार केला. 


यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे, माजी अध्यक्ष नेताजी पाटील, माजी पंचायत समिती सभापती बालाजी गावडे, जिल्हा परिषद सदस्य राजनंदिनी कोळगे, पंचायत समिती गटविकास अधिकारी समृद्धी दिवाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख, तालुका आरोग्य अधिकारी आयवळे, सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष दिग्गज दापके, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार,वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल सूर्यवंशी, कर्मचारी सचिन कपाळे सर आदी उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला फाउंडेशनचे अध्यक्ष गालिब पठाण, सचिव श्याम पाटील यांनी केअर सेंटर मध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती आमदार पाटील व मान्यवरांना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन खापरे यांनी व प्रास्ताविक अॅड. उपेंद्र कटके यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दक्षता फाऊंडेशनचे गोविंद पाटील, नंदकुमार मनाळे, सुनील वेदपाठक, बालाजी माने, अतिक सय्यद, रणजीत बर्डे, गुड्डू सोनटक्के यांनी पुढाकार घेतला. यावेळी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ गवळी,डॉ अविनाश गावडे, जुनेद शेरीकर, ग्रामविकास अधिकारी करपे , माजी सरपंच मोहन खापरे, नवाब पठाण, संतोष आगलावे, राजाभाऊ सोनटक्के आदी उपस्थित होते.


   गावातील रुग्णांना गावातच उपचार

 सध्या कोरोना आजारामुळे मृत पावणाऱ्यांची संख्या वाढत आहे. जिल्हा स्तरावरील रूग्णालयात उपचार घेत असताना रुग्ण घाबरत असल्यामुळे मृत्यू वाढत आहेत. तसेच अनेक जण आजाराच्या भीतीमुळे टेस्टही करणे टाळत आहेत. यामुळे दक्षता फाउंडेशनच्या माध्यमातून गावातील रुग्णांना गावातच उपचार मिळण्यासाठी  केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. जिल्ह्यातील अशा पद्धतीने उभे करण्यात आलेले हे पहिलेच सेंटर आहे.  

  

शासनाकडे सुपूर्त केल्या किल्ल्या

दक्षता फाउंडेशन’ने सर्व सुविधांनी युक्त सेंटर उभे करून शासनाला सुपूर्त केले आहे. याच्या किल्ल्या आमदार पाटील यांच्या हस्ते तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आयवळे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या. सेंटरमध्ये नागरिकांना पिण्यासाठी व वापरण्यासाठी गरम पाणी, वाफ घेण्यासाठी यंत्रणा उभी करण्यात आली आहे. दुर्दैवाने रुग्ण आल्यास आणखी बेडची व्यवस्था वाढवली जाणार आहे.