रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर इंजेक्शन बाहेरुन आणण्यास भाग पाडाल तर खबरदार 

- जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर
 

उस्मानाबाद -  जिल्ह्याच्या विविध भागात कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी खास कोरोना रुग्णालयांसाठी परवानगी देण्यात आलेली आहे. रुग्णांसाठी आवश्यक असलेले रेमडेसिवीर हे इंजेक्शन संबंधित रुग्णालयांनी रुग्णास उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मात्र काही रुग्णालये रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर हे इंजेक्शन बाहेरून आणण्याची सक्ती करीत आहेत. त्यामुळे यापुढे एकाही रुग्णालयाने रुग्णाच्या नातेवाईकास ते इंजेक्शन बाहेरुन आणण्यासाठी भाग पाडू नये असे सक्त आदेश दिले आहेत. त्या बरोबरच जर ते इंजेक्शन बाहेरुन आणण्यास भाग पाडले तर त्या रुग्णालयावर धडक व कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर दिला आहे.

दिलेल्या आदेशात असे नमूद करण्यात आले आहे की, ज्याअर्थी उपरोक्त वाचा क्रमांक २ चे अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र कोव्हीड उपाययोजना नियम २०२० प्रसिद्ध केले असून यातील नियम क्रमांक ३ नुसार कोरोना विषाणू मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी जिल्हाधिकारी यांना त्यांचे कार्य क्षेत्रात सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे उस्मानाबाद जिल्ह्यात  कोव्हीड -१९ रुग्णावर उपचार करणाऱ्या कोव्हीड -१९ रुग्णालयांमध्ये शासनाकडून वेळोवेळी प्राप्त मार्गदर्शक सूचनांनुसार रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करण्यासाठी संदर्भ क्रमांक ४ च्या आदेशान्वये समिती स्थापन करण्यात आलेली आहे

 उस्मानाबाद जिल्ह्याला शासनाकडून प्राप्त होत असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचे वाटप त्या-त्या रूग्णालयाच्या क्षमतेनुसार व मागणीनुसार करण्यात येत असून दैनंदिन वाटप करण्यात आलेल्या रेमदेसिविर इंजेक्शनची रुग्णालय निहाय यादी उपयुक्त समितीकडून प्रसिद्ध करण्यात येत आहे तसेच संदर्भ क्रमांक ४ मध्ये नमूद आदेशान्वये रेमडेसिविर इंजेक्शनच्या पुरवठ्याबाबत रुग्णालयांना सविस्तर मार्गदर्शक सुचना व कार्यपद्धती देण्यात आली आहे त्यानुसार ज्या रुग्णालयांमध्ये कोविड -१९ रुग्ण उपचार घेत आहेत या रुग्णालयांनी स्वतः त्या रुग्णास रेमडेसिविर इंजेक्शन व औषधे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे 

तथापि असे निदर्शनास येत आहे की अनेक रुग्णालय कोव्हीड -१९  रुग्णाच्या नातेवाईकांना बाहेरून रेमडेसिविर इंजेक्शन आणण्याची सक्ती करीत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील हेल्पलाइन क्रमांकावर याबाबत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत आहेत. तसेच रुग्णालयांनी रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून रेमडेसिविर इंजेक्शन आणण्यास सांगितल्यामुळे रेमडेसिविर इंजेक्शनच्या उपलब्धतेच्या चौकशीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात रुग्णांवर उपचार करणाऱ्या सर्व रुग्णालयांना (डीसीएच) (डीसीएचसी ) याद्वारे असे आदेशित करण्यात येत आहे की, एखाद्या रुग्णाला आवश्यकता असल्यास त्यांची वैद्यक शास्त्रीय प्रमाणीकरणाची जबाबदारी संबंधित हॉस्पिटलची आहे. तर संदर्भ क्रमांक ४ मध्ये नमूद या कार्यालयाच्या आदेशातील कार्य पद्धतीनुसार रुग्णालयांनी स्वतः रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन व इतर औषधे उपलब्ध करून द्यावीत. 

तसेच रुग्णाच्या नातेवाईकांना रेमडेसिविर इंजेक्शन व इतर औषधे बाहेरून आणण्यास सांगू नये.  कोव्हीड - १९ अनुषंगिक संचार बंदीच्या काळात नातेवाईकांना अशा प्रकारे ठिकाणी जायला सांगून त्यांनाही संसर्गाचा धोका निर्माण होत असून या सूचनांची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, अन्यथा संबंधित रुग्णालयांवर महाराष्ट्र  कोव्हिड -१९ उपाय योजना नियम २०२० आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ ते ६० तसेच भारतीय दंड संहिता ४५ ऑफ १८६० कलम १८८ व इतर लागू होणार्‍या कायदेशीर तरतुदीनुसार दंडनीय कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिवेगावकर यांनी दिला आहे.