रेमडीसिवीर वायल्सचा जिल्हावार तपशील जाहीर करा - आ. राणा जगजितसिंह पाटील
उस्मानाबाद - राज्यात १ एप्रिल पासून वितरीत केलेल्या व दि. २७ एप्रिल पासून वितरित करण्यात येणाऱ्या रेमडीसिवीर वायल्सचा जिल्हावार तपशील जाहीर करावा, अशी मागणी भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संबंध महाराष्ट्र होरपळत असून एप्रिल महिन्यात रुग्ण संख्येत अनपेक्षित वाढ झाली आहे. आजही उस्मानाबाद जिल्ह्यात रेमडीसिवीर, ऑक्सिजन व रुग्णांसाठी खाटांचा प्रचंड तुटवडा भासत आहे.
केंद्र सरकारने २१ ते ३० एप्रिल दरम्यान राज्य निहाय रेमडीसीविर च्या किती वायल्स पुरवठा करणार याची यादी प्रसिध्द केली होती. राज्यात या औषधांच्या तुटवडयाचे राजकारण होत असताना महाराष्ट्राला सर्वाधिक रेमडीसिवीरचे वाटप करण्यात येणार आहे. सुरुवातीला २६९२०० वायल्स मंजूर करण्यात आल्या होत्या. उपचाराधीन रुग्ण संख्येचा विचार करता हा पुरवठा कमी असून त्या प्रमाणात राज्याला अधिक च्या वायल्स द्याव्यात अशी राज्याने केलेली मागणी ग्राह्य धरत महाराष्ट्राला आणखीन वाढवून देत ४३५००० वायल्स देण्यात येत आहेत.
रेमडीसीविर औषधाच्या व्यवस्थापन व वितरणाचा विषय हा पुर्णत: राज्य सरकारच्या अखत्यारितील अन्न व औषध प्रशासन विभागांतर्गत येतो. जिल्ह्यातील उपचाराधीन रुग्ण संख्येच्या प्रमाणात याचे वाटप अपेक्षित होते, याबाबत निर्णयही झाला होता, मात्र याची अंमलबजावणी केली जात नाही. राज्यातील सर्वच विभागात लोकसंख्येच्या प्रमाणात सारखीच परिस्थीती असतांना औषधे व इतर संसाधनांचे असमान वितरण केले जात असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. दि. १४/०४/२०२१ रोजी जालना जिल्ह्यात रेमडीसीविर च्या १०००० वायल्स आल्या, परंतु त्या दिवशी उस्मानाबाद जिल्ह्यात एकही रेमडीसीविर आले नाही. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे मागणी केल्यानंतर त्यांनी ५०० वायल्स दिल्या.
त्यामुळे महाराष्ट्र सरकारने देखील ०१/०४/२०२१ पासून जिल्हावार पुरविण्यात आलेल्या वायल्स ची आकडेवारी जाहीर करावी जेणे करून मागील चुका उघड होतील व भविष्यात असे होणार नाही. तसेच केंद्रा प्रमाणे वाटपामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी उपचाराधीन रुग्ण संख्येचा विचार करुन पुढील काळात वाटप करावे व जिल्हा निहाय वाटप करण्यात येणाऱ्या रेमडीसिवीर वायल्स चा तपशील जाहीर करावा, अशी मागणी आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी केली आहे.