वाशी पोलीस ठाण्यावर संतप्त लोकांची दगडफेक 

 पोलीस निरीक्षकन उस्मान शेखसह तीन पोलीस कर्मचारी जखमी 
 

उस्मानाबाद: उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी पोलीस स्टेशनमध्ये सोमवारी (दि.५) रात्री अकरा वाजेच्या सुमारास मोठा राडा झाला.  कोठडीदरम्यान एका आरोपीची प्रकृती खालावून त्याचा रुग्णालयात मृत्यू झाल्याने संतप्त जमावाने वाशी ठाण्यावर अचानक हल्ला चढविला. यावेळी झालेल्या दगडफेकीत पोलीस निरीक्षकासह अन्य दोन कर्मचारी जखमी झाले आहेत.


 
वाशी तालुक्यातील पारा येथील रमज्या लाला काळे यास वाशी पोलिसांनी एक गुन्ह्यातील वारन्टमध्ये १ एप्रिल रोजी ताब्यात घेतले होते. त्यास न्यायालयासमोर हजार केले असता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. दरम्यान, त्याची प्रकृती खालावल्याने त्यास उस्मानाबादच्याशासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर पुढील उपचारासाठी त्यास सोलापूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्याचा ४ एप्रिल रोजी मृत्यू झाला. यावरून त्याचे नातेवाईक संतप्त झाले. मयताचे शव घेऊन आलेली रुग्णवाहिका सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास जमावाने वाशी ठाण्यासमोरच लावली.


 
यानंतर या जमावाने ठाण्यास घेराव घालून दगडफेक सुरू केली. यावेळी वाशी ठाण्याचे निरीक्षक उस्मान शेख, कर्मचारी परशुराम पवार, भागवत झोंबडे हे बाहेर आले असता, झालेल्या दगडफेकीत ते जखमी झाले. यानंतर पोलिसांनीही जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या ७ नळकांड्या फोडल्या. तेव्हा जमाव पांगला. जखमी पोलिसांना तातडीने वाशीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील निरीक्षक उस्मान शेख गंभीर जखमी झाल्याने त्यांना उस्मानाबादला पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले. दरम्यान, घटनेची माहिती कळताच पोलीस उपअधीक्षक डॉ विशाल खांबे हे वाशीला पोहोचले. त्यांनी तपासाच्या सूचना करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.