कोविड हेल्थ सेंटरसाठी खाजगी रुग्णालयांच्या 11 इमारतींचे अधिग्रहण

उस्मानाबाद जिल्ह्यात  223 खाटा राखीव
 
  -जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचे आदेश  

उस्मानाबाद - जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोविडचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यावर मोठ्या प्रमाणात उपाय योजना करण्याचे काम जिल्हा प्रशासन आणि आरोग्य  विभागाच्या यंत्रणामार्फत होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील आकरा खाजगी रुग्णालयाच्या इमारतीचे अधिगृहण करुन येथील 223 खाटा राखून ठेवण्यात येणार आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज  जारी केले आहेत.

          कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या “Management Of Suspect / Confirmed Cases of COVID-19” मधील मार्गदर्शक सूचना जिल्हा प्रशासनास प्राप्त झाल्या आहेत.

          कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे आणि विषाणूच्या संसर्गात अधिक वाढ होऊ न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे तसेच पूर्वतयारी योजना आखणे आवश्यक आहे. कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे जिल्ह्यात आपत्तीजनक परिस्थिती उदभऊ नये यासाठी पूर्वतयारी करणे अगत्याचे झाले आहे. या पार्श्वभूमीवर “Management Of Suspect / Confirmed Cases Of COVID-19” मधील मार्गदर्शक सूचनांच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी श्री. दिवेगावकर यांनी आपत्ती व्यवस्थापन  अधिनियम 2005 मधील कलम 33 आणि 65 अन्वये उस्मानाबाद जिल्ह्यातील पुढील इमारती आरोग्य विभागाच्या अधिनस्त “Dedicated COVID Health Center (DCHC)” म्हणून स्थापन करण्यासाठी पुढील आदेशापर्यंत अधिसूचित व अधिगृहीत करण्याचे आदेश दिल आहेत.

          उस्मानाबाद येथील निरामय हॉस्पीटल एकूण खाटांची संख्या 35 आणि राखीव खाटांची संख्या 18, पल्स हॉस्पीटल एकूण खाटांची संख्या 60 आणि राखीव खाटांची संख्या 30, सह्याद्री हॉस्पीटल एकूण खाटांची संख्या 50 आणि राखीव खाटांची संख्या 25, सुविधा हॉस्पीटल एकूण खाटांची संख्या 50 आणि राखीव खाटांची संख्या 25, चिरायु हॉस्पीटल

एकूण खाटांची संख्या 30 आणि राखीव खाटांची संख्या 15, तुळजापूर येथील कुतवळ हास्पीटल एकूण खाटांची संख्या 30 आणि राखीव खाटांची संख्या 15, उमरगा येथील गजानन हॉस्पीटल एकूण खाटांची संख्या 30 आणि राखीव खाटांची संख्या 15, शिवाई हॉस्पीटल एकूण खाटांची संख्या 30 आणि राखीव खाटांची संख्या 15, डॉ.डी.के.शेंडगे हॉस्पीटल एकूण खाटांची संख्या 50 आणि राखीव खाटांची संख्या 25, कळंब येथील श्रीकृष्णा हॉस्पीटल एकूण खाटांची संख्या 50 आणि राखीव खाटांची संख्या 25, वाशी येथील विठ्ठल हॉस्पीटल एकूण खाटांची संख्या 30 आणि राखीव खाटांची संख्या 15 या सर्व इमारतीत एकूण खाटांची संख्या 445 असून यापैकी 223 खाटा राखून ठेवण्यात येणार आहेत.

          येथील जिल्हा शल्य चिकीत्सक आणि जि.प.चे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार या यंत्रणा स्थापन करुन संनियंत्रण करावयाचे आहे. तसेच ही माहीती डॅशबोर्डवर अद्ययावत करावयाची आहे. या सर्व DCHC मध्ये नियंत्रण करण्याची सर्वसाधारण जबाबदारी आणि DCHC चे नोडल अधिकारी म्हणून जि.प.चे जिल्हा आरोग्य अधिकारी हे काम पाहणार आहेत. केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या आणि देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे.

          या ठिकाणी खाजगी महात्मा ज्योतीराव फुले योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयांनी योजनेअंतर्गत लाभार्थी कोव्हिड रुग्णांना उपचार देणे बंधनकारक आहे, असेही या आदेशात जिल्हाधिकारी श्री. दिवेगावकर यांनी म्हटले आहे.