उस्मानाबादजवळ बिबट्या आला आणि मरण पावला ...

बिबट्याच्या मृत्यूचं गूढ वाढलं !
 

उस्मानाबाद - उस्मानाबाद शहराजवळ असलेल्या  घाटंग्री गावाच्या परिसरात  एक बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला आहे. शनिवारी पहाटे एका शेतकऱ्याच्या जेव्हा लक्षात आले तेव्हा  हा बिबट्या जिवंत होता पण काही वेळातच त्याचा मुत्यू झाल्याने गूढ वाढले आहे.


नर जातीचा आणि अंदाचे वय अडीच वर्षाचा असलेला हा  बिबट्या भक्ष्य न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे. मात्र   घाटंग्री  परिसरात पहिल्यादा हा बिबट्या आल्याने आणि लगेच मृत झाल्याने गावकऱ्यात घबराट पसरली आहे. 

उस्मानाबाद शहरापासून आठ किलोमीटरवर अंतरावर असलेला घाटंग्री शिवार डोंगराळ भाग असून,या भागात तसेच धाराशिव लेणी,हातलादेवी परिसरात जंगल आहे. मात्र या भागात याआधी कधीही बिबट्या आढळला नव्हता किंवा बिबट्याची चर्चाही नव्हती.

शनिवारी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान शिवारात बिबट्याने डरकाळी फोडली,त्यानंतर नागरिकांचे त्याच्याकडे लक्ष गेले.एका झाडाखाली बसलेला हा बिबट्या काही वेळातच बेशुद्ध झाला.कुत्र्यांनी त्याला चावा घेण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर नागरिकांची गर्दी वाढत गेली.नागरिकांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना ही माहिती दिली. त्यानंतर पथक दाखल झाले. पथकाने पंचनामा केला असून,उस्मानाबाद येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात शवविच्छेदन आले आहे.