अणदूरच्या श्री खंडोबाचे सिंहासन श्रावण महिन्यापूर्वी चांदीचे होणार
उस्मानाबाद - तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील श्री खंडोबा मंदिरातील श्रीचे सिंहासन चांदीने मडवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून, श्रावण महिना सुरु होण्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचा मनोदय मंदिर समितीने केला आहे.
तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे श्री खंडोबाचे पुरातन मंदिर आहे. श्री खंडोबा - बाणाई विवाहस्थळामुळे हे मंदिर महाराष्ट्र, कर्नाटक , आंध्र प्रदेश आदी राज्यात प्रसिद्ध आहे. छत्रपती शाहू महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा सभामंडप बांधल्याचा उल्लेख येथे आहे.
या मंदिराच्या गाभाऱ्यातील सिंहासन पितळी होते, त्याची झीज झाल्यामुळे ते बदलण्यात आले असून आता ते सागवान लाकडाचे करण्यात आले आहे, हे सिंहासन आता चांदीने मडवण्यात येत आहे.
श्री चे सिंहासन , म्हाळसादेवी आणि हेगडी प्रधान यांचे प्रभावळ त्याचबरोबर गाभाऱ्याचा दरवाजा चांदीने मडवण्यात येणार असून त्याचे काम मंदीरातच युद्ध पातळीवर सुरू आहे. या सर्व कामासाठी 55 ते 60 किलो चांदी लागणार असून , श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. नाशिक येथील कलाकार परेश कुलकर्णी आणि त्यांचे चार साथीदार हे काम रात्रंदिवस करीत आहेत.
कोल्हापुरात चांदीचा पत्रा तयार
कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथे चांदीचे कारखाने असून या कारखान्यात रविवार दिनांक 10 जुलै (आषाढी एकादशी) रोजी सिंहासन कामासाठी लागणारा 25 किलो चांदीचा पत्रा तयार करण्यात आला. यावेळी मंदिर समितीचे चेअरमन बालाजी मोकाशे, कारागीर परेश कुलकर्णी, सदस्य दीपक मोकाशे, किशोर पुजारी, उमेश ढेपे आदी उपस्थित होते.
या कामासाठी हातभार लावणाऱ्या सर्व भाविकांचे मंदिर समितीचे सचिव सुनील ढेपे यांनी आभार मानले आहेत, तसेच या कामांसाठी ज्यांना सहकार्य करायचे आहे त्यांनी मंदिर समितीशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.