संजय निंबाळकर यांच्यावर औरंगाबाद येथे झालेल्या घटनेचा तीव्र निषेध…

उस्मानाबाद जिल्ह्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ मंजूर करून घेणे हेच अशा प्रवृत्तींना योग्य उत्तर... 
 

उस्मानाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर यांच्यावर औरंगाबाद येथे झालेल्या घटनेचा तीव्र निषेध करत अशा प्रवृत्तींना योग्य उत्तर म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ मंजूर करून घेणे हेच असल्याची प्रतिक्रिया आ. राणाजगजितसिंह पाटील  यांनी दिली. 


छत्रपती शिवाजी महाराज चौक, उस्मानाबाद येथे या घटनेच्या विरोधात सामाजिक संघटना, सर्व पक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी आज निषेध दर्शवला. या ठिकाणी जाऊन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी ही निषेध व्यक्त करत २४ मे रोजी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यासाठी विद्यापीठ उपकेंद्राची पाहणी करण्यासाठी आलेले उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. प्रकाश बच्छाव तथा उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव  विकासचंद्र रस्तोगी यांच्यासोबत झालेल्या चर्चेची माहिती उपस्थितांना दिली. 

उप केंद्राकडे उपलब्ध जागा व इमारती या निकषाप्रमाणे स्वतंत्र विद्यापीठासाठी पुरेशा आहेत. सन २०११ नंतर राज्यात स्वतंत्र जिल्हास्तरीय विद्यापीठाचे गठन झालेले नाही. जिल्ह्यातील सत्ताधारी नेत्यांनी या विषयावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत सर्व संबंधितांची बैठक बोलवावी व सर्व पक्षीय मागणी प्रमाणे स्वतंत्र विद्यापीठ मंजूर करून घ्यावे हेच औरंगाबाद येथे घडलेल्या या दुर्दैवी  घटनेला योग्य उत्तर असेल असे मत व्यक्त केले.