तेरणा साखर कारखाना भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून सील
उस्मानाबाद - जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दिनांक २४ एप्रिल २०२२ च्या सर्वसाधारण सभेमध्ये भैरवनाथ शुगर्स ने भरलेली अनामत रक्कम ८ टक्के व्याजासह परत करून नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याबाबत नविन ठराव संमत करून डीआरटी औरंगाबाद कोर्टात अतिरिक्त शपथपत्र दाखल करण्यात आलेले आहे. तसेच ठरल्या प्रमाणे रक्कम प्राप्त न झाल्याने भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने पुन्हा आरआरसी कारवाई राबवत कारखाना सील करून मालमत्ता ताब्यात घेतली आहे.त्यामुळे पुन्हा एकदा नवा पेच निर्माण झाला आहे.
भैरवनाथ शुगर्स व ट्वेंटीवन शुगर्स यांच्या वादात तेरणा कारखाना सुरू करण्याची प्रक्रिया रखडली आहे. डीआरटी, डीएआरटी, मा.उच्च न्यायालय, मा. सर्वोच्च न्यायालय यामध्ये ही प्रक्रिया कधी पूर्ण होईल, हे प्रश्न चिन्हच आहे. यावर्षी गळीत हंगामात शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान व झालेली हेळसांड चिंताजनक असून ५००० मेट्रिक टन प्रतिदिन गाळप क्षमता असणारा हा कारखाना पुढील हंगामात तरी चालू होणे कारखाना व बँकेच्या सभासद व परिसरातील शेतकऱ्यांसाठी गरजेचे आहे. सहकार मंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्याशी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी भ्रमणध्वनीद्वारे याबाबत चर्चा केली असून त्यांच्या व केंद्रीय सहकार मंत्री ना. अमितजी शहा यांच्या माध्यमातून तोडगा काढून कारखाना सुरू करणे शक्य आहे व या अनुषंगाने राज्याच्या सहकार मंत्र्यांना पत्र देऊन तेरणा संघर्ष समितीसह सर्व संबंधितांची बैठक बोलावण्याची मागणी त्यांनी केलेली आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दिनांक २४ एप्रिल २०२२ च्या सर्वसाधारण सभेमध्ये भैरवनाथ शुगर्स ने भरलेली अनामत रक्कम ८ टक्के व्याजासह परत करून नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याबाबत नविन ठराव संमत करून डीआरटी औरंगाबाद कोर्टात अतिरिक्त शपथपत्र दाखल करण्यात आलेले आहे. तसेच ठरल्या प्रमाणे रक्कम प्राप्त न झाल्याने भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने पुन्हा आरआरसी कारवाई राबवत कारखाना सील करून मालमत्ता ताब्यात घेतली आहे.
तेरणा कारखान्याबाबत झालेल्या या नवीन घडामोडी बाबत कारखान्याचे अनेक सभासद अनभिज्ञ आहेत. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेत रेंगाळत असलेला कारखाना, भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे सील, कारखाना पुढील हंगामात कशा प्रकारे चालू करता येईल, सहकार मंत्री यांची बैठक लावून घेणे व बैठकीत कोणते मुद्दे मांडावेत याबाबतची सविस्तर चर्चा करण्याच्या अनुषंगाने आपले विचार मांडण्याची इच्छा असलेल्यांनी उद्या दिनांक २२ मे रोजी सायंकाळी ४ वाजता सर्किट हाऊस, शिंगोली, उस्मानाबाद येथे उपस्थित रहावे, असे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.