शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्येच सुरू करण्यासाठी फेर तपासणी समिती येणार...

-आ. राणाजगजितसिंह पाटील
 

धाराशीव (उस्मानाबाद) - जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची समिति दि. ०४.०२.२०२२ रोजी आली होती. त्यांनी गंभीर त्रुटी निदर्शनास आणत सन २०२२-२३ च्या प्रवेश प्रक्रियेस मंजूरी नाकारली होती. 

युती सरकार आल्यापासून या अतिशय महत्वाच्या विषयाकडे पूर्ण ताकतीने लक्ष देण्यात आले व त्रुटींची पूर्तता करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आली होती. मागील सरकारकडून वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्या व्यतिरिक्त केवळ २ प्राध्यापक जुलै महिन्याच्या आधी उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यानंतर मात्र १८ प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली व गेल्या आठवड्यात २८ नवीन प्राध्यापकांच्या नेमणूकीचा आदेश काढण्यात आला आहे. त्यामुळे आवश्यक शिक्षकांची पूर्तता जवळपास करण्यात आलेली आहे. 

आवश्यक ती वैद्यकीय उपकरणे, साहित्य, फर्निचर देखील उपलब्ध करण्यात आलेले आहे. सदरील महाविद्यालय जिल्हा सामान्य रुग्णालयाशी संलग्नित असल्यामुळे स्वाभाविकच रुग्ण व इतर तत्सम बाबींची पूर्तता आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या तपासणी अहवालात दर्शविलेल्या त्रुटींचा पूर्तता करणारा अहवाल दि.०५/०९/२०२२ रोजी आयोगाच्या नवी दिल्ली येथील कार्यालयात सादर करून राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाला फेर तपासणी करण्याबाबत विनंती केली होती व त्या अनुषंगाने काल ऑनलाइन पद्धतीने, झुम मिटिंगच्या माध्यमातून त्रुटी पूर्ततेबाबत चर्चा झाली व फेर तपासणीबाबत समिती गठित करून पाठवण्याचे ठरले आहे.

 
या तपासणीत त्रुटींची पूर्तता झाल्याचे निदर्शनास येईल व शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याची मंजूरी मिळेल असा विश्वास आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.