उस्मानाबाद जिल्ह्यातील परिचरांच्या भरतीमुळे आरोग्य सेवेचा दर्जा उंचावणार
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्हयातील आरोग्य विभागाकडील उपकेंद्रातील रिक्त असणाऱ्या अर्धवेळ स्त्री परिचर पदे भरण्याची मागणी गेल्या सहा वर्षांपासून प्रलंबित होती.ही पदभर्ती पूर्ण झाल्याने आरोग्य सेवेला गती प्राप्त होईल आणि त्यामुळे निश्चीतच आरोग्य सेवेचा दर्जाही उंचावेल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या सभागृहत 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ६३ अर्धवेळ स्त्री परिचर यांच्या निवडीचे आदेश देण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एन.डी.बोडके, सहा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शिवकुमार हालकूडे, आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी तसेच नव्याने नियुक्ती आदेश मिळालेल्या परिचरांचे कुटुंबीय उपस्थित होते.
अर्धवेळ स्त्री परिचर यांना एक वर्षाच्या कालावधीसाठी अटी आणि शर्तींच्या अधीन राहून काम करण्याच्या अटीवर पदस्थापना देण्यात आली आहे. या नवनियुक्त परिचर देण्यात आलेल्या आरोग्य उपकेंद्रात कार्यरत राहून तेथील स्वच्छते सोबतच आरोग्य सेविका यांना लसीकरण आणि इतर सहा राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या अमंलबजावणीत मदत करणार आहेत.
जिल्हयातील आरोग्य विभागाकडील उपकेंद्राच्या ठिकाणी मागील सहा वर्षांपासून रिक्त असणाऱ्या ६३ अर्धवेळ स्त्री परिचर यांची पदभरती तालुका निहाय गुणवत्तेच्या आधारे पूर्ण करण्यात आली. यामध्ये जिल्हयातील आठही तालुक्यांमध्ये पदभरतीच्या अनुषंगाने तालुका निवड समितीने शिफारस केलेल्या पात्र उमेदवारांना छाननीअंती ६३ अर्धवेळ स्त्री परिचर यांना निवड आदेश देण्यात आले.