परंडा : महाआरोग्य शिबिराचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा

-   आरोग्यमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत
 

उस्मानाबाद -  उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा येथे दिनांक 27व 28 नोव्हेंबर रोजी आरोग्य विभागाच्या वतीने महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर घेण्यामागचा उद्देश हाच आहे की ग्रामीण भागातील माता भगिनी तसेच आबालवृद्ध यांना मोठमोठ्या शहरात तसेच ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, या ठिकाणी विविध आजाराच्या तपासण्या तसेच त्याकरिता लागणारे उच्चस्तरीय चाचण्या,महागडी औषधी याची उपलब्धता तेवढ्याशा प्रमाणात होत नाही, तसेच एकाच ठिकाणी विविध प्रकारचे तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळत नाही,त्यामुळे काही गंभीर आजार हे वाढत जाऊन त्या रूग्णांला,त्यांच्या नातेवाईकास उपचार करणे अवाक्याच्या बाहेर वाटते, मग अशावेळी जमिनजुमला, दागदागिने हे गहाण ठेऊन उपचार करावा लागतो, अशात ते कुटुंब उध्वस्त होते, अशी वेळ  नागरिकांवर येऊन या करिता हे महाआरोग्य शिबिर आयोजित केले असल्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी सांगितले.

           दोन दिवसीय या शिबिरात देशभरातील उच्च तज्ञ डॉक्टर्स हे उपस्थित राहणार असून यात विविध विकारातील मोठमोठ्या रूग्णालयातील हे सर्व तज्ञ डॉक्टर्स आहेत. यांच्याकडून तपासणी, औषधोपचार आणी गरज वाटल्यास मोफत शस्त्रक्रिया ह्या होणार आहेत. महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून एकाच छताखाली प्रतिबंधात्मक उपचार व निदानात्मक उपचार या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असून या शिबिरात ह्रदय रोग, अस्थिव्यंग,डोळ्याचे विकार, कर्करोग, पोटाचे विकार, मेंदूचे विकार, यासह इतर गंभीर आजाराची तपासणी, औषधोपचार, विविध चाचणी, आणी अवघड शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत असे त्यांनी सांगितले.

          उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यातील आबालवृद्ध तसेच माता-भगिनी यासर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहनही या निमित्ताने त्यांनी केले आहे. शिबिराची परांडा येथील कोटला मैदानावर सर्व तयारी सुरूच आहे.