उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घाडगे यांची तडकाफडकी बदली 

 

उस्मानाबाद - उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांची पोलीस नियंत्रक कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे, त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. 


स्थानिक गुन्हे शाखेचे वादग्रस्त पोलीस निरीक्षक दगुभाई शेख यांची १ नोव्हेंबर २०२० रोजी पोलीस नियंत्रक कक्षात बदली करण्यात आल्यानंतर गजानन घाडगे  यांची नियुक्ती करण्यात आली होती, पण दीड वर्षाच्या आतच घाडगे यांचीही नियंत्रक कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. 


स्थानिक गुन्हे शाखेची मुख्य जबाबदारी ही क्रीम पोस्टिंग समजली जाते. तुळजापुरात काही दिवसापूर्वी एका डान्सबारवर पडलेल्या छाप्यामध्ये काही प्रतिष्ठित लोकांना सोडून देण्यात आल्याने त्याचे खापर घाडगे  यांच्यावर फोडण्यात आले आणि विशेष पोलीस महानिरीक्षक ( आयजी ) च्या आदेशावरून घाडगे यांची बदली करण्यात आल्याची चर्चा सुरु आहे. आता घाडगे यांची जागी कोणाची नेमणूक होते, याकडे लक्ष वेधले आहे. सध्या प्रभारी चार्ज सपोनि निलंगेकर यांच्याकडे देण्यात आला आहे. 


जिल्ह्यात चोऱ्या आणि दरोड्यात वाढ 

उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून चोऱ्या आणि दरोडा आदी गुन्ह्यात मोठी वाढ झाली आहे. १५ दिवसांमध्ये शहरात सात तर जिल्ह्यात ३० चोरीच्या घटना घडल्या आहेत. १५ दिवसांच्या दरम्यान जिल्ह्यात विविध ठिकाणी ३० तर एकट्या उस्मानाबाद शहरात सात चोऱ्यांचे प्रमाण आहे. म्हणजे शहरात दर एका दिवसाला तर जिल्ह्यात दिवसात किमान दोन चोऱ्यांचे प्रमाण आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात चोरटे सक्रिय झालेले असताना जिल्ह्यात पोलिस यंत्रणा अस्तित्वात आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे. पोलिस केवळ चोरीनंतर पंचनाम्यालाच हजर होत असल्याचे दिसत आहे. या प्रकारामुळे नागरिक हादरून गेले आहेत


चार दिवसांपूर्वी पोस्ट कॉलनी, कर्मवीर नगरभागात दरोडेखोरांनी अक्षरश: धुमाकूळ घातला. दोन घरातील महिला, पुरूषांना मारहाण करून दागिने लुटण्यात आले. मारहाण करत असताना कसलीही दयामाया न दाखवता लाकडी दंडुक्याने वार करण्यात आले. यामध्ये एकावर सोलापूरच्या खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांची तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आल्यामुळे त्यांनी प्रकृती स्थिर आहे. दरम्यान इतका मोठा धुडगूस घालणाऱ्या चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अद्यापही यश आलेले नाही. पोलिसांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरत आहेत. दरम्यान, गेल्या १५ दिवसांमध्ये जिल्ह्यात चोरटे जोमात आहेत.
.