उस्मानाबाद लाइव्हचा दणका : तहसीलदार गणेश माळी यांना पाचशे रुपये दंड 

 

उस्मानाबाद - उस्मानाबाद लाइव्हच्या दणक्यानंतर  वादग्रस्त तहसीलदार गणेश माळी यांना शासकीय वाहनावर बेकायदेशीर अंबर दिवा लावल्याप्रकरणी पाचशे रुपये दंड करण्यात आला आहे. उस्मानाबाद जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेचे सपोनि अमित व्ही. मस्के यांनी हा दंड वसूल केला असून, पावती क्रमांक १५५८४५०  आहे. 

उस्मानाबादचे वादगस्त तहसीलदार  गणेश माळी यांनी आपल्या शासकीय वाहनावर बेकायदेशीर अंबर दिवा लावला होता, त्याचे व्हिडीओ उस्मानाबाद लाइव्हने प्रसारित करताच, तहसीलदार  गणेश माळी यांनी शासकीय वाहनावर बेकायदेशीर अंबर दिवा काढून ठेवला. परंतु बेकायदेशीर अंबर दिवा लावल्याप्रकरणी तहसीलदार  गणेश माळी  यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी आरटीओ आणि  वाहतूक नियंत्रण शाखेकडे केली होती. 

या  तक्रारीनंतर जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेचे सपोनि अमित व्ही. मस्के यांनी आरटीओकडे मार्गदर्शन मागितले असता, पाचशे रुपये दंड करण्याचे निर्देश आरटीओनी दिले होते, तरीही जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेचे सपोनि ए. व्ही. मस्के यांनी जिल्हादंडाधिकारी  यांच्याकडे पुन्हा मार्गदर्शन मागितले असता, दंड करण्याचे अधिकार जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेकडे असल्याचे सांगून हात झटकले होते. 

सर्वसामान्य वाहनधारकांना किरकोळ कारणावरून दंड करणारे उस्मानाबाद जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेचे सपोनि ए. व्ही. मस्के यांनी तहसीलदार  गणेश माळी यांच्यासमोर अखेर नांगी टाकली होती.  बेकायदेशीर अंबर दिवा प्रकरणी पाचशे रुपये दंड करण्यास त्यांचे हात थरथर कापू लागले होते. याबाबत उस्मानाबाद लाइव्हने दि. २० जानेवारी रोजी बातमी प्रकाशित करताच, मस्के यांच्या पायाखालील वाळू सरकली. प्रकरण अंगलट येण्याची लक्षणे दिसताच, त्यांनी अखेर तहसीलदार गणेश माळी यांना शासकीय वाहनावर बेकायदेशीर अंबर दिवा लावल्याप्रकरणी पाचशे रुपये दंड केला आहे, त्याचा पावती क्रमांक १५५८४५०  आहे. 

उस्मानाबादचे वादग्रस्त तहसीलदार गणेश माळी यांना बेकायदेशीर अंबर दिवा प्रकरणी पाचशे रुपये दंड झाल्याने  त्याची शासकीय दप्तरी नोंद घेऊन प्रशासकीय चौकशी करण्याची मागणी  सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी केली आहे.