श्री खंडोबाचे १५ जानेवारी रोजी नळदुर्गहून अणदूरला प्रस्थान 

 

उस्मानाबाद  - मैलारपूर ( नळदुर्ग ) येथील  पावणे दोन महिन्याच्या वास्तव्यानंतर श्री खंडोबाचे दि. १५ जानेवारी ( रविवार ) रोजी नळदुर्गहून अणदूरला प्रस्थान होणार आहे. यावेळी नळदुर्ग ते अणदूर पालखी मिरवणूक निघणार असून, श्रीचे अणदूरमध्ये आगमन झाल्यानंतर आकाशात रंगीबेरंगी शोभेचे दारूकाम करून मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. 

श्री खंडोबा - बाणाई विवाहस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मैलारपूर ( नळदुर्ग ) येथील श्री खंडोबाची महायात्रा ५, ६ आणि ७ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडली. ८ जानेवारी रोजी रविवार आल्याने महायात्रा पुन्हा भरली होती. या चार दिवसात एकूण १० लाख भाविकांनी श्री खंडोबाचे दर्शन घेऊन आपली मनोकामना व्यक्त केली. 

अशी आहे प्रथा 

तुळजापूर तालुक्यात अणदूर आणि नळदुर्ग  अशी दोन वेगवेगळी गावे आहेत. दोन्ही गावात चार किलोमीटर अंतर आहे. दोन्ही गावात श्री  खंडोबाचे मंदिरे आहेत, पण देवाची मूर्ती एकच आहे. श्री खंडोबाचे अणदूर येथे सव्वा दहा महिने आणि नळदुर्ग येथे पावणे दोन महिने वास्तव असते. 

वर्षातील देवदीपावली रोजी अणदूरची छोटी यात्रा भरते, यादिवशी श्री खंडोबाची मूळ मूर्ती पालखीत आणि म्हाळसा, हेगडीप्रधान, मार्तंड भैरव यांच्या मूर्ती  मानकऱ्यांच्या डोक्यावर वाजत गाजत नळदुर्गला चंपाषष्ठी आणि पौष पौर्णिमा महायात्रेसाठी नेली जाते. देवाची मूर्ती नळदुर्गला असताना दर रविवारी यात्रा भरते, त्याला खेटे असे संबोधले जाते. पौष पौर्णिमा महायात्रा झाल्यानंतर नवमीला पुन्हा श्री ची  मूर्ती अणदूरला नेली जाते. यावेळी अणदूरहून नळदुर्गला आणि नळदुर्गहून अणदूरला मूर्ती नेताना दोन्ही गावातील मानकऱ्यात देवाचा करार केला जातो, हे विशेष. 


अणदूरला १६ जानेवारी रोजी पहाटे श्रीचे आगमन 

प्रथेपरंपरेनुसार १५ जानेवारी ( रविवार ) रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास  श्री खंडोबाचे नळदुर्गहून अणदूरला प्रस्थान होणार आहे. यावेळी अणदूर आणि नळदुर्गच्या मानकऱ्यांचा श्री खंडोबा देवस्थान तर्फे यशोचित सत्कार करून, स्नेहभोजन देण्यात येईल. त्यानंतर दोन्ही गावातील मानकऱ्यात लेखी करार होईल. त्यानंतर म्हाळसा, हेगडीप्रधान, मार्तंड भैरव यांच्या मूर्ती  अणदूरला मार्गस्थ होतील . त्यानंतर श्री खंडोबाची मूर्ती पालखीत घालून वाजत गाजत अणदूरला नेण्यात येईल. वाटेत ही पालखी घोडके यांच्या शेतात विसावा घेईल. त्यानंतर पालखी वेशीत आल्यनंतर सुवासिनी महिला देवाचे औक्षण करून स्वागत करतील, पालखी  मंदिरात आल्यानंतर पुजारी समाजातील सर्व महिला देवाचे औक्षण करतील. 

पालखी १६ जानेवारी रोजी पहाटे अणदूरला आल्यानंतर आकाशात शोभेचे दारूकाम करण्यात येईल. तसेच संपूर्ण गावात प्रत्येक घरासमोर सडासारवण करून तसेच रांगोळी घालून देवाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येणार आहे.