मानेवाडी : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा खून केल्याच्या आरोपातून पतीची निर्दोष मुक्तता
उस्मानाबाद - चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा जाळून खून केल्याच्या आरोपातून तुळजापूर तालुक्यातील मानेवाडी येथील पाराप्पा विश्वनाथ बर्वे यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. उस्मानाबादचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. पेठकर यांनी हा निकाल दिला आहे.
आरोपीचे वकील अॅड. विजयकुमार शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेची माहिती अशी, दि. 27 जानेवारी 2019 रोजी पाराप्पा विश्वनाथ बर्वे यांची पत्नी इंदुबाई हिने जिल्हा शासकीय रुग्णालयात सोलापूर येथे उपचारादरम्यान पोलिसांना जवाब दिल्यावरून तिचा मृत्युपूर्व जवाब नोंदवण्यात आला. त्यामध्ये तिच्या जवाबात असे लिहिले की, दि. 27/1/2019 रोजी ती व तिचा पती पाराप्पा हे नळदुर्ग येथील खंडोबाचे देवदर्शन करून सायंकाळी सहा वाजता स्वतःच्या घरी आले असता, आरोपी पाराप्पा याने तिला शिवीगाळ करून भेटायला नाही का आला तुझा यार? असे म्हणून चारित्र्यावर संशय घेतल्याने त्या टेन्शनमध्ये तिने घरामध्ये ठेवलेल्या प्लास्टिकच्या डब्यामधील रॉकेल स्वतःच्या अंगावर ओतून घेतले. तेव्हा पाराप्पा याने त्याच्या शर्टच्या खिशामधील काडीपेटी काढून स्वतःकाडी पेटवून तिच्या अंगावर टाकली.
त्यात तिच्या अंगावरील साडीने पेट घेतल्याने पाराप्पा याने घरातील गोधडी तिच्या अंगावर टाकून आग विझविली. तिला उपचाराकरिता नळदुर्ग येथील सरकारी दवाखान्यात तिचा पुतण्या चंद्रकांत बर्वे यांनी दाखल केले. तेथे प्रथमोपचार घेऊन पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे दाखल केले. वरील घडलेल्या प्रकाराबाबत पाराप्पा बर्वे यांचेविरुद्ध कायदेशीर तक्रार आहे असा जबाब नोंदविण्यात आला. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 33/ 2019 कलम 307, 504 भादंविनुसार आरोपी पाराप्पा याच्याविरुद्ध नोंद झाला. पोलिसांनी आरोपीस अटक केली.
दरम्यान, दि. 22/2/2019 रोजी आरोपीची पत्नी इंदुबाई हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आरोपीविरुद्ध कलम 302 वाढवून कलम 302, 307, 504 भादंविनुसार पोलिसांनी तुळजापूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. मृत्यूपूर्व जबाब आणि कलम 302 असल्यामुळे आरोपीला जामीन मिळाला नाही. खटल्याचा निकाल लागेपर्यंत तो जिल्हा कारागृहात कैद होता. त्यानंतर सदरचा खटला सुनावणी साठी जिल्हा व सत्र न्यायालय, उस्मानाबाद येथे वर्ग करण्यात आला. सदर प्रकरणात आरोपीवर दोषारोप ठेवून प्रकरणात सुनावणी घेण्यात आली. आरोपी वरील गुन्हे सिद्ध करण्यासाठी सरकार पक्षातर्फे एकूण 12 साक्षीदार तपासण्यात आले आणि सदर साक्षीदारांचा बचाव पक्षा तर्फे उलट तपास जेष्ठ विधिज्ञ अॅड. विजयकुमार शिंदे यांनी घेतला. त्यानंतर बचाव पक्षातर्फे नळदुर्ग येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर यांचा जवाब नोंदवण्यात आला.
आरोपीच्या पत्नी इंदुबाई हिने प्रथम तेथे उपचार घेतला होता व त्या डॉक्टरांना घटनेबद्दल सांगितले होते. अॅड. शिंदे यांनी त्यांचा सरतपास नोंदवला तर सरकारी वकीलांना त्यांचा उलट तपासणी केली. न्यालयासमोरील साक्षीपुरावा झाल्यानंतर सदर प्रकरणांमध्ये सरकार पक्षातर्फे सरकारी वकिलांनी आणि आरोपीतर्फे बचावामध्ये जेष्ठ विधिज्ञ अॅड. विजयकुमार भगवानराव शिंदे यांनी अंतिम युक्तिवाद केला. यानंतर अॅड. विजयकुमार शिंदे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून सदरचा मृत्युपूर्व जवाब विश्वसनीय ठरत नाही म्हणून दि. 18/5/2022 रोजी उस्मानाबाद येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी पारप्पा बर्वे याची निर्दोष मुक्तता केली. सदर प्रकरणात आरोपी तर्फे बचावाचे काम जेष्ठ विधिज्ञ अॅड. विजयकुमार शिंदे व अॅड. विश्वजीत शिंदे यांनी पाहिले. यात मोहरील म्हणून पवनराजे पांचाळ यांनी सहकार्य केले. या प्रकरणाकडे तुळजापूर तालुक्यासह संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्याचे लक्ष लागून होते.