भूमचे पुरवठा निरीक्षण अधिकारी पाच हजाराची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात 

 

उस्मानाबाद  - दोन रेशन दुकानांच्या विनात्रुटी म्हणजेच सकारात्मक अहवाल पाठविल्याबद्दल ५ हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून रंगेहात पकडले. ही कारवाई दि.७ मार्च रोजी केली असून आरोपीस गजाआड केले आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, भूम तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील वर्ग- २ चे पुरवठा निरीक्षण पंडित रामराव राठोड (वय- ४४ वर्ष) यांनी तालुक्यातील तक्रारदाराच्या दोन रेशन दुकानांचे अहवाल विना त्रुटी म्हणजेच सकारात्मक दिले होते. त्या मोबदल्यात राठोड यांनी ६ हजार रुपयांच्या लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली होती. मात्र तडजोडी अंती ५ हजार रुपये लाच घेण्याचे राठोड यांनी मान्य केले. दि.७ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून राठोड यांना लाचेची रक्कम स्विकारताना पंचा समक्ष रंगेहात पकडले. 


ही कारवाई उस्मानाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक प्रशांत संपते यांनी औरंगाबाद विभागाचे पोलिस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून यशस्वी केली. या पथकामध्ये पोलिस अधिकारी दिनकर उगलमुगले, मधुकर जाधव, सचिन शेवाळे, विशाल डोके यांनी केली. दरम्यान, कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी कायदेशीर कामासाठी लाच मागत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद येथे संपर्क करावा. तसेच संपर्क करण्यासाठी फोन नंबर ०२४७२- २२२८७९ किंवा प्रशांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक संपते मो.नं. ९५२७९४३१०० वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.