उस्मानाबाद जिल्ह्यात,दरोडे, चोरी लूटमार आदी गुन्हयात वाढ 

आ. आमदार कैलास पाटील यांची थेट गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे तक्रार 
 
वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी गृहराज्यमंत्री यांनी घेतला आढावा.

उस्मानाबाद - उस्मानाबाद  जिल्ह्यासह शहरात मागील काही दिवसांमध्ये ,दरोडे, चोरी लूटमार आशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे नागरिक दहशतीखाली असून रात्र जागून काढण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. पोलिसांना या घटनांचा अद्याप उलगडा करता आलेला नाही. तपास यंत्रणा कुचकामी ठरल्यामुळे यात सुधारणा घडवून आणून, नागरिकांना भीतीच्या वातावरणातून मुक्त करता यावे, त्यांना निर्धोकपणे वावरता यावे, यासाठी पोलीस महासंचालक व स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन उपाययोजना आखाव्यात, अशी मागणी आमदार कैलास (दादा) पाटील यांनी राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे केली होती. 

या अनुषंगाने शंभूराजे देसाई यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार ओमप्रकाश  राजेनिंबाळकर , आमदार  कैलास  पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयातील दालनात आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी रात्रीची पेट्रोलिंग वाढवावी, पोलीस उपअधीक्षक यांनी ग्रुप कॉल करावेत, दैनंदिन रात्र गस्त पथक तैनात करावेत, ग्राम सुरक्षा यंत्रणा तसेच आवश्यक तेथे सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित कराव्यात, नाकाबंदी सुरू करावी, पेट्रोलिंग नियमित सुरू ठेवावी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांचे दौरे वाढवावेत, अशा सूचना  गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई  यांनी यावेळी दिल्या.

याप्रसंगी उपसचिव संजय खडके, अतिरिक्त महानिरीक्षक एम. राजकुमार, कक्ष अधिकारी अतुल गव्हाणे तसेच दूरदर्श प्रणालीद्वारे संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम.प्रसन्ना व पोलीस अधीक्षक श्रीमती निवा जैन उपस्थित होते.

 या बैठकीमुळे पोलीस यंत्रणा अधिक क्रियाशील होऊन नागरिकांना दिलासा देण्याचे काम करतील, अशी अपेक्षा आहे. चोरट्यांची दहशत पूर्णपणे नाहीशी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून, यासाठी त्या उपाययोजना सरकार व पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून राबविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू राहीलअसे आ. कैलास पाटील यांनी सांगितले.