उस्मानाबाद जिल्ह्यातील गरोदर महिलांची कर्नाटकात बेकायदेशीररित्या गर्भलिंग तपासणी
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील गरोदर महिलांची कर्नाटकातील गुलबर्गा येथे बेकायदेशीररित्या गर्भलिंग तपासणी केली जात होती. मुलगा आहे की मुलगी हे तपासण्यासाठी येथे महिलांची गर्दी होत होती. या सोनोग्राफी केंद्रावर उस्मानाबादच्या आरोग्य पथकाने धडक कारवाई करून डॉ. गुरुराज कुलकर्णी यास अटक केली तर एजंट फरार झाला. उस्मानाबादच्या ऍड. रेणुका शेटे यांनी याकामी मोलाची कामगिरी बजावली.
महाराष्ट्र - कर्नाटक सीमावर्ती भागातील गरोदर मातांचे कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे बेकायदेशीररित्या गर्भलिंग तपासणी व निदान केले जात असल्याची गोपनीय माहिती उस्मानाबादच्या आरोग्य विभागाला मिळाली होती त्यानंतर चोख प्लॅनिंग करून पथकाने गुलबर्गा गाठले , दोन दिवस थळ ठोकून डीकॉय गरोदर मातेच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे गर्भलिंग चाचणी व निदान करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला घटनास्थळावरून कुठेही नोंदणी नसलेले पोर्टेबल सोनोग्राफी मशीन व अन्य साहित्याचे जप्त केले तसेच संबंधित डॉक्टरला ताब्यात घेतला असून आळंद शहरातील एजंट मात्र फरार आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा - लोहारा या सीमावर्ती भागातील मुलींच्या जन्माचे प्रमाण मागील काही वर्षापासून झपाट्याने कमी होत आहे, त्यामुळे आरोग्य यंत्रणेचे या परिसरात करडी नजर होती. असे असतानाच उमरगा व अन्य भागातील गरोदर मातांना कर्नाटक राज्यातील आळंद येथे नेऊन बेकायदेशीरपणे गर्भलिंग चाचणी व निदान करण्यात येत असल्याची धक्कादायक तक्रार येथील आरोग्य यंत्रणेकडे ऑनलाईन धडकली .
यानंतर वरिष्ठांच्या निर्देशानुसार उमरगा उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विक्रम आळंगेकर व विधी सल्लागार ऍड. रेणुका शेटे यांना डीकॉय गरोदर माताच्या माध्यमातून स्टिंग ऑपरेशन करण्याचे निर्देश दिले, चोख नियोजन करून पथकाने डिकॉय गरोदर मातेद्वारे आळंद शहरातील एजंटशी संपर्क केला , मुलगा आहे की मुलगी आहे हे पहायचे आहे, किती पैसे लागतील , अशी विचारणा केली . त्यानंतर पंधरा हजार रुपये दर असल्याचे एजंट यांनी सांगितले.
पंधरा हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर कुठे यायचे अशी विचारणा केल्यानंतर एजन्टाने गुलबर्गा येथे आल्यानंतर सांगतो असे म्हटले , त्यानंतर हे पथक डीकॉय गरोदर मातेला घेऊन गुलबर्गा ते धडकले . लागलीच एजंट तेथे आला . हा एजंट संबंधित डिकॉय गरोदर महिलेला घेऊन गुलबर्गा येथीलच एका जुन्या खोलीत घेऊन गेला . पथकाने पोलीस फौज फाट्यासह त्याच्या मागोमाग जाऊन धडक कारवाई केली , तोवर एजंट पसार झाला. पोलिसांनी बीएएमएस धारक डॉ. गुरुराज कुलकर्णी यास ताब्यात घेतले, यानंतर जुन्या कपाटातील कुठेही नोंदणी नसलेले पोर्टेबल सोनोग्राफी मशीन व अन्य साहित्य जप्त केले . संबंधिताविरोध कायदेशीर कारवाई सुरू केल्याची माहिती विधी सल्लागार ऍड.रेणुका शेटे यांनी दिली.